भरलेल्या आभाळानं पहाटेचा उसासा रोखून धरला होता. कोपऱ्यांना गुडघ्याशी मुडपून दोन्ही हाताच्या आवळलेल्या मुठी हनुवटीशी एकत्र ठेवत एक थोराड वयाचा गृहस्थ मोठ्या पुलाच्या कठड्यावर बसून होता. त्याचे जीर्ण पाय अर्धेअधिक ओले झाले होते. त्याच्या अनोळखी पण परिचित असलेल्या चेहऱ्यावरची सुरकुती उमलवणारी हास्याची लकेर कसल्यातरी दीर्घ अशा श्रमसाफल्याची साक्ष देत होती. त्याच्या विरुध्द दिशेला वर्तमानपत्र चाळीत मी उगाच बसून होतो.
"कृष्णेची सोबत नाही सोडवत. १०० वर्षांपूर्वीपासून असणार नातं संपताना जीवाला कस असह्य करुन सोडत. चिंतामणी चिंता वाहतो खरा, त्यानं करुन घेतलेली चरणसेवा त्याच्या चरणीच अर्पण करावी आणि कृष्णाप्रवाहात विलीन होऊन कृष्णा बनून जाव." त्याचा तो आवंढा गिळणारा आवाज थरथरत होता.
न राहवून मी उठून जवळ गेलो आणि विचारलं " बाबा काही हवयं का तुम्हाला, तुम्ही कुठले, तुमच नाव काय?"
त्यानं स्मित करत आभाळाकडे पाहील. एरवी डोळे दिपवणारा सूर्याचा तेजस्वी गोळा आज पांढऱ्याफकट आभाळात उघड्या डोळ्यांनीदेखील सुस्पष्ट दिसत होता.
"त्या समोर दिसणाऱ्या भास्कराला कधी विचारलस की तुला काय हवय? त्या कृष्णेच्या प्रवाहाला कधी विचारल आहेस तु कुठला? त्या तीरावरील काळ्या पाषाणावरच्या असंख्य पींडींना कधी विचारलस तुमची नावं काय? नाही ना. तुझे प्रश्न ही तितकेच निरर्थक आहेत बाळा" त्याने माझ्यावरची दृष्टी गणपतीच्या मंदीराकडे वळवली आणि तो सांगू लागला, "मला जरी त्या विलायतेतून आलेल्या लोकांनी घडवल असल तरी खर प्रेम दिलं ते इथल्या माणसांनी. कृष्णेजवळ कित्येकांनी आपली मनं मोकळी केली इथं बसून. काहींनी हितगुजं सांगितली, काहींनी पापकबुली देत पुण्याच्या हिशोबाच्या जाहीराती मांडल्या, काही वाट्याला आलेल्या दुःखाला विसरणारी बघीतली आणि काही फोडणी देत ते दु:ख दामदुप्पट करणारीही बघीतली. समाधानी असणाऱ्यांपेक्षा अगदी उतारवयातही सुखाच्या अपेक्षांच गबाळ डोक्यावर घेऊन फिरणारी आजही पाहातोय. दुतर्फा गर्दी पाहीली, आंदोलने पाहीली, स्वातंत्र्य पाहील, सण उत्सवांनी भरुन गेलेली विराटनगरी अन् कृष्णेच्या पाण्यात दिव्यांनी उजळून गेलेली त्रिपुरारी पाहीली, पूर पाहीला, कृष्णेची पवित्रता त्या पूरानं अनुभवता आली. असो या दक्षिणकाशीची सेवा करण्याच पुण्य या बापड्याच्या नशीबी आल ते महत्भाग्याचं. या दोन्ही तीराचा सांधा बांधताना आता फार थकायला होत. मनाची इच्छा असली तरी शरीर साथ देत नाही आता."
एक दीर्घ सुस्कारा देत तो शांत झाला. पुन्हा माझ्या दिशेने नजर फिरवत तो म्हणाला,"फार उशीर झालाय आता, मला निघायला हवं. तो कालपुरुष केव्हाही येईल. जुन्या सिद्धतेला आठवणीचे अनुस्वार देण्यासाठी आणि नव्या अस्मितेच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी. मी निघतो"
पाठमोरा होऊन तो झपझप चालू लागला. दिसेनासा झाला. मी मात्र स्तब्ध, सारंच स्वप्नवत. त्यानंतर मी खूप वेळ त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. तो पुन्हा मला भेटेल? या मोठ्या पुलाचा 'वास्तुपुरुष'.
sushब्द...🌼🌼