कर्जाचा बोजा
गीर वस्तीतल्या बजाबाला बोलवून मी उसासे टाकतच बैतोबाच्या देवळापाशी पोचलो. देवळाच्या पुढच्या बाजूला गावातली बरीचं पुरुष मंडळी जमली होती. पाटील देशमुख, इनामदार आणि सरपंच आप्पा अशी प्रतिष्ठीत मंडळी चौथऱ्यावर मांड्या घालून बसली होती. त्यांच्या उजव्या बाजूला मधल्या आळीची तान्या वाघाची भाल्यासारखी उंच म्हातारी सजा वाणीण उभी राहून हातवारेे करत मोठमोठ्याने बडबडत होती. तिच्या माग तान्याची बायको कमरेवर हात देत उभी होती. डोळे गरगर फिरवत ती कुणालातरी शोधत होती. तान्या मात्र त्या दोघींच्या मागं दगडावर दात पोखरीत एकटाच शांत बसला होता. जणू या प्रकरणाशी त्याच काहीच देणंघेणं नव्हतं. मी तिथे पोचताच धोतराचा सोगा हातात धरत चौथऱ्यावरुन उतरुन आप्पांनी विचारलं,"बजा कुठायं रं?"
"मळ्यात होता, पायाव पाणी घेऊन येतोच म्हणला"
"लगोलग हीकडच आणायचा न्हायस व्हय मळ्यास्न?"
तेवढ्यात हातात काठी घेऊन अंधारातून चालत आलेला बजाबा मला दिसला.
"तबघा आलाचं तो" म्हणत मी बोटानं दाखवलं.
आज तान्या आणि बजाबाच्या जमिनीचा निवाडा बैतोबाच्या आणाभाका घेऊन गावाच्या साक्षीनं होणार होता.
तान्या गरीब होता, अनपढ होता. दहा पांड जमिनीचा तुकडा आणि एक दुभत जनावर एवढाच त्याचा प्रपंच. आडनावाचाच वाघ पण बोलीचालीला, स्वभावाला मवाळ असणारा तान्या वाळक्या पाचोळ्यावर पाय न देणारा होता. घराच्या छोट्या खोलीत किराणा मालाचं दुकान काढून गूळ, तेल, मीठ, शेंगदाणं विकणारी त्याची म्हातारी आई सजा वाणीण आपल्या मिळकतीतला एक नया छदामही त्याला देत नव्हती. तंबाखू खायची झाली तरी म्हातारीकडे त्याला पैसे मोजावे लागत. उलट शहरातल्या वाण्याकडून दुकानात भरलेल्या मालाची उधारी तान्याच्या नावावर मांडून ती बिनबोभाट धंदा करत असे. अशा अप्पलपोटी सजा वाणीणीची सून, तान्याची बायकोही मोठी हरामदख्याली होती. गावच्या सोनारवाड्यात तिच सारख जाणयेणं होतं. शे- दोनशे रुपयाची लुगडी फाडून, दिवसातनं दहा कप चहा पिऊन ती बामणाच्या माणसांसारखी झ्याकीत राहायची. सूनेवर तोंड टाकायला गेलेल्या सजा वाणीणीचे दोन्ही हात धरून तिनं चार गालफाडावर ठेवून दिल्या होत्या. तेव्हापासनं तान्याही तिला भिऊन असायचा. म्हातारी आणि बायकोच्या अशा मनमानी वागण्यामुळं तान्या खंगत चालला होता. कर्जाचा बोजा आणि वरची सगळी देणी भागवायच्या काळजीनं तो अगदी मेटाकुटीला आला होता.
कर्जापायी अशा कलागती बायकांचा विचार न घेता शेवटी त्यानं गीर वस्तीतली जमीन विकायच ठरवलं. ती जमीन बजाबाच्या वावराला लागूनच होती. बजाबालाही ती हवी होती पण तान्या तयार होत नव्हता. आता आयती संधी चालून आल्यावर बजाबाला ती सोडायची नव्हती. तान्याशी ठराव करून त्यानं जमीनीची इसार पावती करुन घेतली. अंगठा उठवून दहा हजार रुपये बंडीत घालत तान्या घरी आला. घरी पोचताच तिथला प्रकार पाहून त्याची दातखिळच बसली. त्या दोघींना कुठून कुणकुण लागली कळलं नाही. म्हातारीनं आढ्याला दोर लावून फास तयार केला आणि बायको अंगावर रॉकेल ओतून घेऊ लागली. त्यानं दारात पाय ठेवताच दोघींनीही गहिवर घातला. घटकाभरातच सारा गाव जमला, सगळ्यांनी तमाशा बघितला. शेवटी चार जाणत्या माणसांनी पुढ होत त्या दोघींची समजूत घातली.
इसार पावती रद्द करायला तान्या बजाबाकडं गेला पण तो कुठंतरी गावाला गेलाय आणि आठवडाभर येणार नाही अस कळलं. त्या दिवसापासून दोघींनीही तान्याला धारेवर धरलं. कुठून बुद्धी झाली आणि हा उद्योग करुन बसलो अस तान्याला झालं. आठवडाभरानं इसार रद्द करायला तो बजाबाकड आला तेव्हा बजाबानं पावती द्यायला नकार दिला. आता हे प्रकरण बैतोबाच्या देवळापर्यंत पोचलं.
बजाबा येताच म्हातारीचा आणखी कालवा सुरू झाला. तान्याच्या बायकोला तिच सावज सापडलं तशी तीही म्हातारीच्या पुढे होत शीव्या देऊ लागली. बजाबा त्या दोघींच्यापुढं कमी पडू लागला. शेवटी पाटलानं मध्यस्थी करत गोंधळ थांबवला.
पाटील म्हणला,"खुळ्यावानी भांडू नगा, एकएकानं बोला. तान्या बायकूला आवर घाल. देवाम्होरं शीव्या नगं"
बजाबा सांगू लागला,"व्हय पाटील, जिमिन इकायच्या वक्ताला ह्यनं मिंदू इकला हुता व्हयं"
"व्हयं पर झाली एक डाव चुकी, बजा आर नग लय ताणून धरू" आप्पा म्हणाले.
तशी म्हातारी खेंदारली,"पह्यल्यापस्न ह्यो मेला डोळा ठिवन् हुता जिमिनीव. यकल पोर बघून भुलावतो व्हय रं त्यला. मी हाय खमकी बापडी त्यजाबरं. माजा सोन्याचा घास गिळाया टपलायस व्हयं रं. आर बापजाद्याची पुण्याई हाय ती तशी न्हाय पचायची तुला."
"ए म्हातारे, मला काय करायची हाय तुझी जिमिन, माझीच मला मस हाय. तान्याला इकून खाणारी तू. आमास्नी नग शिकवू." बजा म्हातारीवर खेकासला.
"बजा आर तुज्या पाया पडतो, माझा जीव नग घीव आता. मी माझ्या मरणानं मरतुया, तू नग आनी धपाट्या घालू." शांत बसलेला तान्या आता बजाच्या हातापाया पडत कळवळू लागला. तेवढ्यात देशमुख म्हणाला,
"आर् मग आडलय कुठं? बजा, दिऊन टाक त्यजी इसाराची पावती त्यला, तान्या तुबी दे त्यजं पैक."
"आन् याज कशान् दिव व्? घर इकू व्हय माज?" बजा म्हणला.
"म्हंजी र?" पाटलानं डोळे बारीक करत विचारल.
"मी काय पैका पुरुन ठिवला हुता व्हय, ह्यजी जिमिन घ्ययापाय? दहा घरं फिरुन रुपय गोळा केलं. हजारामागं दोनशे आगुदरच काढून घेतलं सावकारानं. आन आता ह्यो जिमिन द्यायाची नाय म्हंतो म्हंजे मी पाक गळ्याइतका बुडलो." बजानं पाटलाला फोडून सांगितलं.
"लेका पाक रिन काढून सण केलास की रं तू" देशमुखानं हिणवलं. आता तान्या रडकुंडीला येत विनवू लागला,
"आप्पा ह्यो गुतडा आता तुमीच सोडवा."
"काय करतो तान्या आता झाल्या गलत्या निस्तारायच्या. सांगतो तस करा. तान्या तू आपला इसार धरून चार हजार रुपय बजाला दी आनं पावती घी त्यजाकडनं. काय बजा पटतयं नव्ह तुला." बोलता बोलता आप्पांचे डोळे चमकले. बजाच्या आकसलेल्या चेहऱ्यावरच्या रेषा क्षणात विखुरल्या. त्यावेळी मला त्या दोन मुखवट्यांचा अर्थच समजला नाही.
जत्रेत विकायला येणारे विदुषकाचे, देवाचे, राक्षसाचे बहुरंगी मुखवटे किती एकतारी असतात. विदुषकाचा किंवा देवाचा मुखवटा असला तर तो हसरा असतो. पण दोघांच्या हसण्यात दोन ध्रुवांच अंतर असतं. यापैकी देवाचं हसणं निर्विकार आणि विदुषकाचं खेळकर. राक्षसाच्या मुखवट्यात भीतीच्याच कित्येक छटा भरल्या जातात. पण खऱ्याखुऱ्या भीतीचे मुखवटे हे राक्षसी नसून मानवीच जास्त आहेत. कारण ते एकरंगी असले तरी एकतारी नाहीत. बऱ्याच जणांचे मुखवटे त्यांच्या चेहऱ्यावरल्या रेषांत वेळोवेळी प्रकट होतात. त्या रेषा दिसतात मात्र ज्याला त्या वाचता येतात तो भाग्यवान. उरलेल्यांचे मुखवटे उराशी जिवंत विस्तव बाळगलेल्या राखेप्रमाणे स्थिर असतात.
असेच असतील ते दोन मुखवटे. त्यावेळी मला ते वाचता आले असते तर. माझी कुवतही नव्हती तेवढी. पाचवीतल्या मुलाला काय कळणार आपल्या बापाच्या पाचवीला काय पुजून ठेवलं होतं ते. शेवटी तान्या खूप हातापाया पडला, पण बजा बधला नाही. आप्पांना विनवू लागला पण 'बैतोबाचा कौल' अस ठोकून आप्पांनी अंग काढून घेतलं. पाठोपाठ देशमुख, पाटील दोघांनी आप्पांना सहमती दिली. बिचारा तान्या रागारागानं घरी गेला. त्यानं स्वत:च्या दहा थोबाडीत हाणून घेतल्या. दुसऱ्याच दिवशी दाव्याला बांधलेल्या दुभत्या म्हशीला त्यानं बाजार दाखवला. ती तेवढीच एक वस्तू तान्याच्या मालकीची उरली होती. इसाराचे दहा आणि व्याजाचे चार हजार रुपये बजाच्या मढ्यावर घालून तो घरी आला आणि इसाराची पावती म्हातारीच्या अंगावर फेकत घर सोडून निघून गेला तसा तो परत आलाच नाही.
इकडं तान्याची बायको तान्याचा दोसरा काढत अंथरुणावर खिळली ती उठलीच नाही. तान्या असताना त्याची चव न ठेवणाऱ्या या बाईनं तान्यासाठी अंथरुण धरलं हे काही केल्या पटण्यासारखं नव्हतं. पण गावात एकदा बोंब सुटली की ती हवा गिळून फुगणाऱ्या बेडकासारखी पसरते. तीचा बैल होत नाही. तिला कसलातरी भयंकर रोग झाला होता. त्यानं ती खंगत मरत होती. आपल्यामुळं आपल्या घरादाराची झालेली काईली पाहून सजा वाणीण वेड्यासारखी वागू लागली. लोकांच्या नसलेल्या उधाऱ्या मागत त्यांच्या दारापुढं जाऊन तोंड वाजवू लागली. बजाच्या नावान बोटं मोडत गावभर हिंडू लागली. तिच्या अशा वागण्यान तिचं दुकानही बंद पडलं.
"तान्याची हाय सासू सुनंला जगू बी द्यायची नाय आण सुखानं मरु बी." पिचकाऱ्या थुकत गावातल्या लोकांना चघळायला विषय झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा