२५ मे, २०२०

पाणवठा

'पाणवठा' विसाव्याचं ठिकाण, वास्तव्याच नव्हे...ते कितीही भुरळ  घालणारं असलं, तरी दोन घटका रमाव, भुलाव, पडाव, डोळा लागला की स्वप्नांना लगाम घालावा... आयुष्याचा रथ हाकण्यासाठी...ही कुंभार माशीही त्यास अपवाद नाही...हा तिचा जीवनरथ असावा, ती सावध आहे... त्या पाणवठ्यातलं तिचं प्रतिबिंब तिची स्वप्न आहेत, भुरळ पाडणारी, आर्त हाक देणारी... वैशाख सरेल, रणरण संपेल, वादळवाऱ्याच्या उसळ्या घेत तो येईल, सगळं तयार असायला हवं, नाही तयार करायला हवं...कर्म कठोर आहे, त्यातून सुटका नाही...🌸

                                                     -sushब्द...🌸


मन

परमेश्वर हा एक सर्वश्रेष्ठ निर्माता आहे... माणसाला त्यान पंचेद्रीयांव्यतिरिक्त 'मन' हा एक जास्तीचा अवयव दिला, त्यानं तो इतर पशुमात्रांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला.....  आज मनाची किंमत ती काय?...अडगळीच्या खोलीतल्या उंचावर असलेल्या कोळ्याच्या जाळ्याइतकी...हो नक्की तेवढीच, वर्षानुवर्षांनी खितपत पडलेल्या, धुलिकणांनी माखून गेलेल्या त्या जाळ्या... बुद्धीनंतर मनालाही संस्कारांचा ऐवज द्यायला का विसरतो आपण?..प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागत... मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते, त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोप असत... मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या सुचवतं...मग ते लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, चित्रकाराला चित्र, संगीतकाराला चाल...केवळ संस्कारांपायी आजची मनं ही अरसिक आहेत, बुद्धीविलासानं ती अतिव्यवहारी झालीत, मनोधर्म विसरलीत... जेव्हा बघावं तेव्हा ती मोबाईलच्या प्रकाशमान चौकटीत पडलेली सापडतात, दिव्याभोवतीच्या चिलटांसारखीच...ही चौकट इतकी उष्ण असते की ती पोळून लुळीपांगळी होतात...मग त्यांना वासनेचे विचित्र हातपाय फुटतात आणि ती भान हरपून विक्षिप्तपणे धावू लागतात,भरकटतात, हरवतात...अगदी कायमचीच!! ही बिथरलेली मन पुन्हा कितीजणांना आणि कशा अवस्थेत सापडतात त्याचे त्यांनाच ठाऊक!!🌸

                                                    -sushब्द...🌸                               

गुलाम

माणसानं निसर्गाशी काडीमोड घेतला आणि तो गुलाम झाला, गुलामगिरी त्याच्या रक्तात भिनली... गुलामगिरी चालते ती हुकूमशाहीच्या बळावर...शरीर, वस्तू, वेळ, सवयी हे सगळे आंतरिक हुकूमशहा... ते हिटलर आणि स्टलिन इतके क्रूर नसले तरी त्यांची सत्ता बिमोड करणे महाकठीण.‌‌..हुकूमशहा आले म्हणजे त्यांची हुकूमी फर्मानं आली...'शरीर' नावाच्या हुकूमशहाची सारी फर्मानं गरजा आणि मागणी स्वरुपात असतात... जिथे 'गरजा' संपतात तिथे 'मागण्या' सुरू होतात... मात्र 'मागण्या' कधीच संपत नाहीत...'वस्तू', या हुकूमशहाची फर्मानं ठराविक काळापुरती येतात, पण ती येतात तो काळ बेचैनीचा...'वेळ', हा हुकूमशहा दिसत नाही, त्याचा तीन काट्यांचा मुकूट तेवढा दिसतो...याचं अस्तित्व मानणारे सगळे 'आस्तिक', न मानणारे 'नास्तिक'...यातल्या आस्तिकांना येतात ती फर्मान, नास्तिकांना येते ती रद्दी...'सवय', हा वेगळा हुकूमशहा नव्हे, तो सगळ्या हुकूमशहांचा 'सेक्रेटरी'...त्यांची हुकूमी फर्मानं लिहणारा आणि पोचवणारा...ही फर्मानं हुकूमशहांची असली तरी त्यावरचे 'शिक्के' मात्र सेक्रेटरीचेच असतात...
                                                    -sushब्द...🌸     

चष्मा

'चष्मा' दोन प्रकारचा असतो, positive-negative, दूरचा-जवळचा...दूरचा चष्मा लावणाऱ्याला जवळच स्पष्टच दिसत का हो?... नाही, तो जवळचच पाहायचं तेवढं विसरतो... तोपर्यंत सारी संकट अंगाशी येऊन बसलेली असतात, वार होऊन जखमा झाल्यावर चष्मा उतरवला जातो... काहींना जखमांची जाणीवच होत नाही कारण त्यांना 'दूरदर्शी' प्यारी झालेली असते....याउलट जवळचा चष्मा लावणारा दूरच सारच पाहतो का?...त्याच्या नजरेच्या टप्यात येईल तेवढंही त्याला दिसत नाही... समोरुन भलामोठा हत्ती निघून जातो...मग हा जवळच्या चष्म्यातून पाऊलखुणा चाचपून निष्कर्ष काढतो, इथून कोणता प्राणी गेला असावा याचा!!!🌸
                                                     -sushब्द...🌸

शिवपुत्र

एकांत

अर्जुन

उत्कृष्टता

वास्तुपुरुष

भरलेल्या आभाळानं पहाटेचा उसासा रोखून धरला होता. कोपऱ्यांना गुडघ्याशी मुडपून दोन्ही हाताच्या आवळलेल्या मुठी हनुवटीशी एकत्र ठेवत ए...