५ जून, २०२०

भाग ५- दत्ता

कुरकुडीची फुलं 

लिंब्यावरुन आल्यानंतर काकानं मला बुवाचा सगळा तपशील सांगितला. बुवाच्या मते ही करणी नव्हती ती अडकून पडलेल्या गुप्तधनाची पेटलेली छळवादी हाक होती. तो घरी पीठ मागायला आला असता त्याला ती जाणवली. तो म्हणत होता येणाऱ्या तीन रात्री वाड्यासाठी फारशा चांगल्या नाहीत. त्या रात्रीत घरातल्या कोणाही एकाच्या जीवावर बेतू शकत. तीन दिवस वाड्यातली कोणतीही वस्तू, कपडा, पैसा अगदी ज्वारीचा दाणाही हातात न बाळगता सगळ्यांनी कुठेतरी दूर जाऊन रहा. बुवा सांगेल तेव्हा काकाच फक्त त्यास भेटायला जातील.
         मला आणि अरविंदाला काकाचा निर्णय पटला नाही. कोण एक बुवा येतो? काहीबाही सांगतो? आपण लगेच त्याला हवं तसं का करायचं? करणीसाठी? छे, नाही, हा वाडा सोडून कुठंच जायचं नाही. पण घाबरलेल्या आजीनं मोडता घातल्यावर आम्हाला ते टाळणं शक्य नव्हतं. त्यानं सांगितल्यासारखं आम्ही तीन दिवस शेजारच्या वाडीतल्या छोट्या घरात राहायला गेलो. पण तो विक्षिप्त बुवा जेव्हा जेव्हा काकाला बोलवेल तेव्हा आपण काकामागं गुपचूप जायचं, असं आम्ही दोघांनीही ठरवलं. लिंब्यावरचं त्याचं ते भयानक रुपडं बघून आम्ही पुरते भ्यालो होतो.
           दुसऱ्याच दिवशी काकाला बुवाचं बोलावणं आलं. मध्यरात्री सगळं चिडीचूप झाल्यावर काका बुवाकडं जायला निघाला. आज अचानक झालेल्या अवपाडी पावसानं रस्त्यावर चिखल धरुन पाणी साठलं होतं. तसला चिखल तुडवत काका वाडीच्या मधल्या वाटेनं थेट लिंब्याच्या दिशेनं चालू लागला. त्याला कुणकुण लागू न देता आम्ही पाठोपाठ निघालो. वर आभाळात हलकं चांदणं पडलं होतं. त्याच्या मंद प्रकाशात आजूबाजूला फुललेली रातराणी वाऱ्याच्या मिलनानं दरवळत खुलतं होती. तिचा पसारा दूरवर नेत वारा थयथय नाचत होता. चिखलानं रेडबडलेल्या पायानिशी काका बुवाच्या झोपडीबाहेर पोचला. त्यानं इकडं तिकडं बघत शहानिशा केली आणि आत शिरला.
         तो आत गेल्यावर आम्ही पहिला कडा चढून वर आलो. धावतच झोपडीच्या पाठीमागं शिरलो. ताटीचं एखादं बारीक छिद्र शोधलं पण ते कुठं सापडलच नाही. त्या झोपडीची प्रत्येक ताटी एका विशिष्ट पद्धतीनं बांधली होती. शेवटी झोपडीच्या मागच्या कोपऱ्यात कान लावून दोघही खाली बसलो. बराच वेळ आतून कसलाच आवाज येईना.  अचानक बुवाचा आवाज आला,"हकडं इताना कुणी बगितलं नाय न"
"न्हाय"
"मी बोलावलय ती घराकडं कुणाला बोलला न्हायस नव"
"न्हाय"
"बरं मी सांगतू ती नीट ऐक, तुझ्या नशिबात अपरंपार धन हाय. सोन्याच्या मोहरानी भरल्याल हंडं हायत, रांजण हाय. तुझ्या परसाला आंब्यापासन हिरीपावतर चर खणलाया ती तुजी लक्ष्मणरेखा. चल य बाहीर."
ते आतून बाहेर येईपर्यंत आम्ही एका उंच शिळेमागं जाऊन लपलो. 
       दोघंही झोपडीतून बाहेर आले. बुवाच्या हातात त्यादिवशी आणलेली कळशी होती. काका दिव्याचा टेंभा घेऊन उजेड दाखवत बुवाच्या मागून आला. बुवानं उजव्या हातातली कळशी डाव्या हाती घेत मंत्र पुटपुटले. उजवा हात पुढे करत अर्ध्य दिल्यासारखं त्यानं कळशीतलं पाणी तळहातावर सोडलं. क्षणार्धात मी जागेवरच थरथरलो. सारं अंग शहारून त्यातून काटे फुटू लागले. त्या काट्यांच्या सूक्ष्म छिद्रांतून रसरसणाऱ्या स्वादोदकानं मी जागच्या जागी भिजून गेलो. 
       अगदी तसाच लाल तीळ. तसल्याच मळवटाचा. तळहाताच्या एकदम मधोमध. कळशीतल्या पाण्याच्या मंद धारेनं तो चमकत होता. कळशी काकाच्या हातात देत तो सांगू लागला,
"आप्पा ही घे, ही साध पाणी नव्हं. हीरीच्या दिशेन गेल्यावं चराच्या उजव्या हाताला चालत जा. फुलं आल्यालं कुरकुडीचं गवात शोध. त्यजा हरएक फुलावं ही पाणी शिपीडं. ह्या पाण्यानं जी फुल पांढऱ्याच लाल व्हयलं त्यजा खाली खणून बग. खणनं तशा आडव्या पहारी लागत्याल. त्यला साखळदंड बांधून धनाचं रांजण आडकावलयं. जवा तुला ती सापडनं तवाच घरावल्या करण्या टळत्यालं. पर ही समद रातच्यालाच व्हया पायजी. हा आनी यक, हीतनं पुढं मला शोधाय लिंब्यावं यीव नगं."
अस म्हणत त्यानं शिळेकडं बघितलं. लगेच आम्ही अंगं आकसून शिळेच्या मागं दडलो. 
          तिच नजर, तोच आवाज, तसलाच तीळ, तसलेच जादूचे प्रयोग आणि पत्र? हो, ते पत्र तसंच माझ्या बॅगेत असेल. अरविंदाची सगळी पत्रं माझ्या संग्रही होती. वाडीला रहायला जाताना माझ्या सगळ्या बॅगा वाड्यातच होत्या. काका कळशी घेऊन शिळेच्या बाजूनं गेले. अरविंदानं दोन तीन वेळा हलवल्यावर मी भानावर आलो. "अरविंदा, चल माझ्याबरोबर."
"कुठं?"
"आपल्या गावातल्या घराकडं. चल पळ पटकनं"
"आर् पर घरात जाऊन काय वेगळच घडलं तर"
"काय नाय होत चल"
      वाड्यात आत आलो. दिवा लावला. बॅग दारातच पडली होती. मी पळत जाऊन बॅग खोलली. बॅगेतलं सगळ जिथल्या तिथं होतं. पत्राच्या गठ्ठ्यातून फिसकटलेलं निळसर पत्र बाहेर काढलं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वास्तुपुरुष

भरलेल्या आभाळानं पहाटेचा उसासा रोखून धरला होता. कोपऱ्यांना गुडघ्याशी मुडपून दोन्ही हाताच्या आवळलेल्या मुठी हनुवटीशी एकत्र ठेवत ए...