५ जून, २०२०

अरविंदाचं पत्र

अरविंदाचं पत्र

"आभास सावली हा असतो खरा प्रकाश

जे सत्य भासती ते असती नितांत भास

हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा खेळ सावल्यांचा"

आज सुरुवात नक्की कशानं करावी तेच सुचत नव्हतं. शेवटी खिडकीच्या डाव्या बाजूच्या देवळीतल्या तू आणलेल्या रेडिओनं मदत केली. सुधीर मोघेंचे शब्द वळीव पावसाच्या थेबांसारखे संगीतरुपाने भरभर अंगावर कोसळले. ते मनात आसुसलेल्या कोरड्या मातीच्या उष्ण कुशीत शिरत लेखणीतल्या शाईला वेग देऊ लागले. मग कागद हाती घेतला आणि शब्दरुपी शाईला अक्षररुपी वळण देऊन तो कागद पत्ररुपाने तुला सुपूर्द केला.
                कवी लेखकांना लाभलेल्या प्रतिभेच्या वरदानासमवेत अनुभवाची तपस्याच जास्त पूर्णत्व बहाल करते. आता हेच बघ ना मोघेंच्या कवितेतले 'सावलीला हसणारे आंधळे' आपण सारेच आहोत नाही का?
                तान्या मला आजही आठवतो. ती घटना मी तुला सांगितली असेल, जी मी स्वत: डोळ्यांनी पाहिली, कानाने ऐकलेल्यांची तर गणतीच करवत नाही. आपले आप्पा खरंच असे असतील? तान्याकडून त्याच्याच पदरचे पाच दहा पैसे उकळून काय सुख मिळाल असेल त्यांना? तो निघून गेल्यावर त्याच्या घराची झालेली वाताहत यांना उघड्या डोळ्यांनी कशी पेलवली? बायको तर आधीच गेलेली. तान्याची आई सजा वाणीण काल गेली. ती उलट्या काळजाची असली तरी तिलाही जीव होताच की. सात आठ वर्षं तळमळलेला तिचा जीव. किती शापांचं विष साठलं असेल त्या जीवात? तान्याचे पैसे घेऊनही यांच भागलं नाही, तो गेल्यावर यांनी 'तान्या पैसे न देता फरार झाला' अशी अफवा उठवत, म्हातारीवर कसलीतरी करणी केली. मग तिला वेडी ठरवून तान्याची ती जमिनही घशात घातली.
                 आता मधल्या आळीत त्याच्या पडलेल्या घरासमोरुन जाताना माझ मनं विषण्ण होतं. त्या निद्रीस्त वास्तूकडे पाहण्याची माझी हिंमतच होत नाही. वाटायला लागतं मी आजतागायत अशा सुखी वास्तू पायाखाली चिरडून वैभवाच्या पाटावर बसत त्यांच्याच वाट्याचे घास रिचवले. कोणीतरी हे रोखायला हवं. त्यांना त्यांच्याच शब्दात त्यांच्याच 'बैतोबाचा कौल' दाखवायला हवा.               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वास्तुपुरुष

भरलेल्या आभाळानं पहाटेचा उसासा रोखून धरला होता. कोपऱ्यांना गुडघ्याशी मुडपून दोन्ही हाताच्या आवळलेल्या मुठी हनुवटीशी एकत्र ठेवत ए...