करणी
पहाटेे चार वाजले असतील. अचानक किंचाळण्याचा आवाज आला. गणा आणि मी खडबडून जागे होत आवाजाच्या दिशेने पळालो. माडीवरच्या खोलीत पायात डोक खुपसून बसलेल्या अरुणेच्या पाठीमागं आजी कानावर हात ठेवत डसाडसा रडत होती. मी पळत आजीकडं गेलो
"काय झालं गं आजे?"
आजी रडक्या आवाजात बोलू लागली,"आर्, कुणी किली कसाबकरणी, वाटोळ् वाटोळ् हुईलं त्यजं"
"आगं पण झालं काय, सांगशिल का नायं"
"बघ बघ, कशी दशा किली पोरीची, गरीब लेकरानंं काय बिगडावलं हुतं रं, ती आशी हेंगाडी करुन ठिवली, आईविना पोरं ती" हातातले अरुणेचे केस पुढं करत आजी कण्हू लागली. तिच्या केसांच्या अंबाड्याचा वेढा लचका तोडल्यासारखा कापला होता. मी अरुणेचे केस निरखून बघितले. तिचे खुरपटलेले बारीकमोठे केस पहावत नव्हते. ती तशीच बारीक आवाजात हुंदके देत रडत होती.
अरुणा तळहाताएवढी असताना आई देवाघरी गेली. तसा तिचा आणि माझा सांभाळ आजीनंच केला. आजी आता थकली होती. तिला होत नव्हतं तरी आम्हा दोघांसाठी घास तोडत जगत होती. मी अरुणेला समजावायला गेलो तशी ती माझ्या गळ्यात पडून आणखी रडली.
इकडे अरुणा शांत होते न होते तोच माळीतून धडाधड आवाज आला.
"दादू माळीत जा. काय झाल बघं. मांजार उलाथलं आसनं तिकडं" आजी म्हणाली.
मी धावत जाऊन माळाच्या शिड्या चढून वर आलो. कोपऱ्यात रचलेल्या पोत्याच्या सगळ्या उतरंड्या ढासळल्या होत्या. फुटक्या गाडग्यांचे तुकडे चौफेर झाले होते. धान्यधुन्य, खतं, साठवणीचं सटरफटर चहूकडे उधळलं होतं. मांजर नाही की घुस नाही आणि उतरंडी कशा ढासळल्या? रांजणं कशी कलंडली? मला कशाचा काहीच पत्ता लागेना. तोवर गणा, आजी, अरुणा सारेच वरती आले. आजी कळवळली," आर् देवा, आता ही काय आनिक?"
"गणा आर् बघतोस काय? कर गोळा सगळं"
आतापर्यंत घडलेली करणी वाड्यापुरतीच मर्यादित होती. तिची बाहेर वाच्छता नव्हती. त्याचदिवशी दुपारी अचानक पुन्हा उतरंडीच्या एकावर एक रचलेल्या पोत्यातलं मधलच पोत पेटलं. जळलेल्या ज्वारीचा करपा वास आणि धूर घरभर पसरु लागला. धूर बघून गावातील लोक पळत येऊ लागले. पाणी मारुन पोत विझवू लागले. पोत विझवून झालही नसेल तोच तिकडं आप्पांच्या खोलीतल्या कापडं भरून ठेवलेल्या बंद ट्रंकेतून भसभस धूर निघू लागला. सारे भारी कपडे पेटले. कोरीकरकरीत धोतरं, जरीचे फेटे, खण, घडी न मोडलेली लुगडीं...आणि सगळं विझायच्या आत जळूनही गेलं.
मधलच पोत कस पेटलं? ट्रंकेला आग कशी लागली? हा काय चमत्कार? गावात चर्चेला तोंड फुटलं.
दिवस बराच सरला. वाड्यात रोजचे व्यवहार घडले नाहीत. गोठ्यातल्या दावणीच्या गाई वैरणीवाचून धारेच्या राहिल्या. चूल पेटली नाही. केर काढला नाही. सारी मंडळी हवालदिल होऊन गेली. जळके कपडे, धान्य, गाडग्याची खापरे याचा खच झाला होता. आप्पा नसताना घरावर मोठा कठीण प्रसंग आला होता. अशावेळी सहानुभूती दाखवणं हे गावकऱ्यांच एक आवश्यक कर्तव्य होतं. रानामाळातून येत लोक वाड्याभोवती जमा झाले.
जी ती आईबाई येई, अरुणेचं भुंड डोक बघून हळहळे,"अगं आई आई! पोरीचं पार रुपाचं बेरुप झाल गं. कुणी मांत्र्यानं करणी केली काय वं"
जो तो दादानाना येई, जळकी कापडं, धान्य, खापरं बघून चुकचुके,"अरारा समदा इस्कूट झाला की वं, च्या मायला, आप्पा नसताना डाव धरुन करणी केल्याली दिसतीया"
रात्रीच्या सुमारास आप्पा काखेत धोकटी अडकवून परगावाहून माघारी आले. आजीनं रडरडून सगळी तपशीलवार हकीगत आप्पांना सांगितली. वाड्यात झालेला सत्यानाश दाखवला. आप्पा धोकटी खुटीला अडकवून शांतपणे आजीला म्हणाले,"बरं हं आवर. पसारा का पडलाय घरात? दिस सरला तरीबी चूल पिटली नाय. उठ रं गणा. का बसलाया टकुर धरुन, गया सोड. वैराण घालून पाणी पाज जा. पोरखेळ सगळा. दादू आर् आवरा पसारा."
आप्पांच्या बोलण्यानं सगळेच धीरावले. जळकी पोती, खापऱ्या सगळं गोळा झालं. चूल पेटली, धार निघाली. सगळे जेवायला बसले. आप्पांनी भाकरीचा तुकडा तोंडात घातला आणि ते संतापले,"भाकरी पीठाच्या केल्यात का राखंच्या?" पण आप्पांखेरीज सगळ्यांना भाकरीची चव वेगळी लागली नाही. तेव्हा माझा ताटातला तुकडा मोडून तोंडात घातला. थू थू थू त्यालाही तिच चव.
जेवण न करताच आप्पा जागचे उठले तोच वाड्याच्या अंगणात एक बचकेसारखा दगड येऊन दाणकन पडला. त्याच्या मागोमाग भिरीरी दगड येऊ लागले. दारावर भिंतीवर धाड धाड आदळू लागले. अंगणात बांधलेलं वासरु एका दगडासरशी पटकन खाली पडलं. पाय झाडू लागलं. आडोशाला ठेवलेल्या हंड्यावर एक धबका बसला. ठणकन् आवाज झाला. तशी आजी आमच्या दोघांना कवटाळत थरथर कापू लागली.
सलग दोन तीन दिवस करणीचं चक्र घाना घालू लागलं. आप्पांनी गावात, वाड्यांत, पंचक्रोशीत सगळीकडं शोधाशोध केली. करणीची शहानिशा करत गावोगाव तपास केला. पोलिस केले, मांत्रिक केला, गुरव केला पण काही उपयोग झाला नाही. चौथ्या दिवशी दाढी मिशा वाढलेला एक धुरकट बुवा पीठ मागायला दारात आला. टोपलीत पीठ पडलं तरी इकडं तिकडं रखारखा बघत राहिला. वाड्याच्या कान्याकोपऱ्यातल्या जाळ्याजुळ्यांसकट सगळ्या वस्तू न्याहाळू लागला. झोपाळ्यावर बसलेल्या आप्पांना त्याच्या वागण्याचा धरगोळ कळला नाही. बराचं वेळ उभा राहिल्यावर तो आप्पांना म्हणाला.
"घराला धनाची आस हाय, राखचा घास उलटायचा नसनं तर इलत्या आमवसेला रातच्याला कोंबडं घिऊन लिंब्याव एकांती भेट."
एवढच सांगून तो निघून गेला. आप्पा बुचकळ्यात पडले. काय हा विलक्षण माणूस? याला कस कळलं राखेचं? धनाची काय भानगड आहे? आनं कोंबडं कशापायी? यात काय फसवाफसवी डावसावं तर नसावा? तशीपण सगळी शोधाशोध झालीच आहे, कशानच गुण येईना. बघू तरी जाऊन.
दुसऱ्या दिवशी पहाटे दत्ता अचानक सुट्टी काढून गावाला आला. मुंबईत त्याला नुकतीच नवी नोकरी मिळाली होती. त्यानं पत्रानं काहीएक न सांगता नोकरी लागल्याच कळवायला तो स्वत: घरी आला होता. त्याच्या त्या आनंदाच्या वार्तेनं वाड्यात दोन घटका सुखाच्या गेल्या. हर्षभराच्या ऐन उन्मादात असलेल्या दत्ताला वाड्यातल्या करणीची करुण कहाणी ऐकवून कोणालाही त्याच्या आनंदावर विरजण घालायच नव्हतं. अरुणेनं डोक्याचे बोडके केसं टावेलानं घट्ट आवळून ताणून बांधले. दत्ताकडं बघत आप्पांनी चार घास डोळे मिचकावत बळेबळे खाल्ले. आजीनं कानाशी बोट मोडत कोट्यातली भीती तोंडावर न आणता दहावेळा दृष्ट काढल्या. गणा गणतीत नसल्यासारखा गोठ्यातच बसू लागला. मी मात्र घुम्यागत गप्प राहून हरएकवेळी त्याला टाळत राहीलो.
घरातली माणसं तोंड मिटून गप्प बुजत राहीली पण लपेलं ती करणी कसली? रात्रीच्या अंधारात गोठ्यात राडा झाला. दगडाला लपेटलेल्या पेटत्या चुंबळी रपरप गोठ्यावर आदळू लागल्या. गया वासरं दावणीची सुटून सैरावैरा पळू लागली. वाळलेली वैरण ढणाढणा पेटली. बघता बघता आगीचा लोळ वाड्यापर्यंत पसरला. करणीचा फास आगीच्या दोरखंडानं आणखी घट्ट आवळू लागला. आप्पांनी बुवाकडं जायचं मनात पक्क केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा