मळवटाचा तीळ
बारा तेरा वर्षे उलटल्यानंतरही गावातल्या सगळ्या गोष्टी अरविंदा मला अगदी जशाच्या तशा सांगायचा. मुंबईत काॅलेजात असल्यापासून त्याची पत्रे पंधरा दिवसाला हमखास यायची. त्यात गावातल्या पतीपासून सतीपर्यंतचा सगळा वृतांत असायचा. ती सगळी मी माझ्याजवळ जपून ठेवलीत. मीही त्याला होस्टेलच्या, काॅलेजच्या सगळ्या गमतीजमती पत्राने कळवायचो. बी काॅमच्या फस्ट इयरला असताना आमच्या होस्टेलमध्ये एक नवा सफाई कामगार रुजू झाला, माने आडनावाचा. काॅलेजमध्ये मिळणाऱ्या कमी वेतनामुळे आणि पोरांच्या नसत्या लफड्यांमुळे तसे कामगार महिन्यालाच बदलायचे. पण हा एक आमच्या लास्ट इयरपर्यंत टिकला. बोलीनं गावंढळ आणि अंगाखांद्यानं सडपातळ असला तरी तो मोठा करामती होता. पोरांच्या कलानं घेतलं की ती खूश राहतात हे त्याला ठाऊक होतं. पैशाच्या बाबतीत मिळेल तेवढ्यात तो समाधानी राहायचा. होस्टेलमध्ये सतत नवनवीन जादूचे प्रयोग करून थक्क करायचा.
माने बैरागी आहे, त्याच्या उजव्या तळहातावर मधोमध हडळीच्या मळवटाचा लाल तीळ आहे, त्याला भुतं वश करायची शक्ती अवगत आहे. तो भुताला बोलवून जादूटोणा करतो त्याच्याबद्दल अशा काहीबाही अफवा होस्टेलमध्ये उठायचा. मलाही सुरुवातीला त्या खऱ्या वाटायच्या. पण असं मानेनं कधी स्वत:च्या तोंडानं सांगितलं नव्हतं.
एकदा असेच आम्ही होस्टेलची तीनचार पोर आणि माने दोरखांबाच्या शेजारील कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो.
बोलता बोलता रव्यानं त्याला विचारलं,"माने, तुमचा उजवा हात दाखवा बरं."
"का बरं, ज्युतीषी करतुस व्हय रं?" माने म्हणाला.
"तस नाय पण मी धन्याशी पैज लावली होती, मानेंचा उजवा हात खोलून दाखवतो म्हणून."
"तुजा डावं दिसतुय मला, पैजचं ढोंग कशापायी? असा दाकीवला असता की मी."
"माने, मग दाखवा की, कुणाची वाट बघताय." धन्याचा उत्साह वाढला.
"ही घे बग. त्यात काये येवड."
त्याच्या उजव्या तळहाताच्या मधोमध असलेला लाल तीळ बघून सारी पोरं हबकली आणि आपआपल्या जागेवर सवरुन बसली. ते बघून माने हसून म्हणाला.
"का रं पोरानो, यवड काय झालं दचकाया? का रं धन्या?"
सगळे गप्प. तेवढ्यात मी विचारलं,
"माने पोरं म्हणतात ते हाडळीच्या मळवटाचं खरं आहे का हो?"
तो माझ्याकडे बघत गूढ हसला.
"ऐकायचयं व्हय तुमास्नी, ऐका तर मग" अस म्हणत खांबाचा आधार घेत सांगण्याच्या पवित्र्यात बसला.
"त्यज आस झालं, हाळणीच्या हाळदिवीची पालखी दर वरसाला आसतीया. दिवीचा नवस फेडाया दर वक्ताला जायाच म्हणत हुतो पर यळच हुत नव्हता. मनाला वरीसभर हुरहुर. पर यक दिस ठरावलं काय बी करुन जायाचं आन दिवीची उटी भरून नवस फेडायचा. आमच्या गावापास्न हाळणीपावतर नुसत्या झाडाझुडुपाची पांदीची वाट आन बाजूनं जंगाल. जाताना दिस व्हता आन पालखीची गर्दीबी बराबर हुती. पर ययच्या वक्ताला मला उशीर झाला. त्या जंगलाच्या पांदीनं मी यत हुतो तवा पाक आंधारभुडूक. जत्रतं कंदील आन थोडं घासल्याट इकत घेतलं हुत, तवा त्यनं पावलापुढलं त्यवड दिसायच. पर पल्ला लामचा हुता तवा मी बी लगबग चालत हुतो.
चालता चालता शेराच्या दाटवाणात आलो. त्या दाटवाणात चार आठ पावलं आत शिरलो तवाच बायांच्या बांगड्यागत किणकिण आवाज झाला. म्हून माग फिरुन बघतुया तवा म्होरं यक पांढऱ्या साडीतली बाय. चांगली गुरीपान आन सडपातळ. कपाळ कुकाच्या मळवटानं भरल्याल. तवाच मी वळीखलं ही काम यगळचं हाय गड्या. ती म्हणली मला बी त्या आंगाला जायाचयं, वाट दावता का जरा. मीबी घाबरत तयार झालो. ती माज्याबरं चालायला लागली. एक दोन मैल चाललू पर दोघबी चिडीचिप. भूत पाणी वलंडायच नाय ह्य मला ठाव हुत. तवा जसा वडा आला तसा मी ह्या हातानं तिजा मळवट पुसला आन वड्याच्या पल्याड जोरात पळत सुटलो. मग रक्ताच्या गुठळीगत ती कुकू साकाळलंन् त्यजा ह्यो ठिपका झाला. त्योच ह्यो मळवटाचा तीळ."
तळहाताकडे बघत तो त्या मळवटाच्या लाल तीळावरुन बोट फिरवू लागला.
माने उठून गेल्यावर रव्या म्हणाला,"माने खर सांगतो का रे आपल्याला?"
बराच वेळ शांत बसलेला दिग्या म्हणाला,"अरे तस आमच्या गावातला नाथा आम्हाला सांगायचा. असा ज्याला हाताच्या मधोमध तीळ असतो त्याला भुतं वश होतात."
"अरे पण तीळाचा आणि भुताचा काय संबंध?" मी विचारलं.
"असा मळवटाचा तीळ असला ना की ते भुत आपल्या ताब्यात राहातं. त्या हाडळीचा नवरा अजून जिवंत असेल. तो कुंकवाचा तीळ मानेनं कायमचा काढू नये म्हणून ती त्याच्याकडे गयावया करतं असेल. त्या हाडळीला अस वाटत रहातं की त्यानं तीळ पाण्यानं धुतला की तो कायमचा पुसून जाईल आणि तिचा हयात असलेला नवरा मरेल. मग आपण त्या भुताला ब्लॅक मेल करायचं. म्हणायचं माझं हे काम कर, ते काम कर नाहीतर तीळाला पाणी लावतो, असं केलं की भुत सांगेल ते ऐकत. " दिग्या त्याची 'भुत' विषयावरची पीएचडी झाल्यासारखं सांगू लागला. मीही समोर भूत बघितल्यासारखं त्याच्याकडं पाहू लागलो.
पुढे लास्ट इयरला असताना एक दिवस साफसफाईसाठी माने माझ्या रुममध्ये आला. मी एका कोपऱ्यात भिंतींना लागून असलेल्या टेबलावर धुऊन झालेली कपडे इस्त्री करून चापूनचोपून ठेवत होतो. माझ्या कॉटवरची तशीच पडलेली कागदं, पत्रे, पेन, वह्या सगळ त्यानं पटपट आवरायला सुरुवात केली. माझ त्याचाकडं जास्त लक्ष नव्हतं. मी माझ्या इस्त्रीच्याच नादात होतो. बराच वेळ झाला तरी झटकाझटकी, आधळआपट असा काहीच आवाज येत नाही, म्हणून मी मागे वळून बघितलं तर तो खाली मान घालून हुंदके देत रडत होता. मला आश्र्चर्य वाटलं. मी त्याला काही विचारायच्या आतच तो जागचा उठत जिन्याच्या दिशेनं चालू लागला. त्याला दोन तीन हाका दिल्या तरी तो तसाच चालत राहीला. कॉटवर बघितलं तेव्हा कागदं, पत्रं, वह्या सगळं तसच पडलं होतं. पत्राचं एक पान ओल झालं होतं, अक्षरं फिसकटली होती. अश्रूंच्या पांढऱ्या ठिपक्याला अक्षरांच्या शाईच्या निळ्या कडा डवरुन ते पत्र अगदी भकास दिसत होतं. कोणाच होतं ते पत्र? मी वाचलं होतं की नव्हतं? याचा काहीच विचार न करता मी सारं आवरुन घेतलं.
त्या घटनेनंतर माने होस्टेलमध्ये बुजल्यासारखा वागू लागला. गप्प गप्प राहू लागला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा