रिंगण
आम्ही बांधाच्या उजव्या बाजूने निघालो. आमावस्येच्या रात्रीचं शिशीरातलं आभाळाचं गोड चांदणं आज तिखट दिसत होतं. बोचणारी थंडी हाड गोठवत होती. गव्हाच्या वावरातून अर्धवट कापलेल्या बाजकानांवर झपझप पावलं उचलत नव्हती. खचाखच ती पायात मोडत सलत होती. सोसाट्याचा वारा, त्या वाऱ्याने कंदीलाची बत्ती फरफरायची. अरविंदा ठेचकळला की त्याच्या खांद्यावरल्या कळशीत पाण्याचा 'चुळ्ळ' आवाज व्हायचा. ती कळशी आम्ही दोघं आळीपाळीनं घ्यायचो. बघता बघता आम्ही पिंपळ्याचा ओढा गाठला. तेवढ्यात ओढ्याच्या विरुद्ध बाजूने एक काळी आकृती खाली सरकताना दिसली. वाळक्या पाल्याचा चपचप आवाज झाला. आम्ही दचकून जागीच थांबलो.
तशी काकानं कंदीलाची बत्ती वाढवून हाक दिली, "कोण ए रं?"
"दाजी, आवं मी हाय!" हाकेला साद आली.
ओढ्यात घुमल्यामुळे तो आवाज मला परिचित वाटला नाही. काकानं कंदीलाची बत्ती कमी केली. बघता बघता ती काळी आकृती आमच्या समोर आली. ती आता काळी न राहता बत्तीच्या उजेडानं उमटू लागली. गणा होता तो, काकाचा घरगडी. थोड्या वेळापूर्वी काकानं काहीतरी काम सांगून त्याला रात्री भेटायला सांगितलं होतं.
"गणा, आरं व्हता कुठं?"
"चांगलं सावज शोधाया उशीर झाला, पर आणलय ती यकदम बढीया हाय." तो हसत सांगू लागला.
"बरं बरं आणखी उशीर नगं, ए पाय उचला रं दोघ बी, चल गणा" असं म्हणत काका सोगा हातात घेत चालू लागला, आम्हीही मागोमाग निघालो. गणा माझ्या मागून चालू लागला, त्याच्या पिशवीत कसलीतरी खडबड होत होती. काका, अरविंदा, मी आणि गणा चौघेच.
निलवर्णी रात्र आता काळवर्णी होऊ लागली. पश्चिमेला लिंब्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत दुतर्फा गडद झाडी होती. काळोख गडद होऊ लागला तसा रातकिड्यांनी जोर धरला. रात्र बधिर झाली. आम्ही आता भरभर चालू लागलो. डोंगराचा चढ जाणवू लागला. झाडांच्या गर्दीतून समोर वर पाहिले असता दिवसा तांबड्या वर्णाचा हिरव्या गर्द झाडीने मोहून टाकणारा लिंब्या काळाकभिन्न दिसत होता. जणू त्यानं मावळतीचा सूर्य आपल्या पोटात दडवून हे रात्रीच साम्राज्य उभ केल होत. ते राखायला तो स्वतः गस्त घालीत उभा होता. पायथ्यापासून पहिला कडा पार केल्यावर सपाटीला एक झोपडी दिसू लागली. त्याच्या डाव्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली कंदील घेऊन एक इसम बसला होता. काकांच्या मागून आम्ही तिघेही त्याच्या समोर आलो. ब्रम्हानंदी टाळी लागल्याप्रमाणे तो तसाच बसून होता, त्याच्याच तंद्रीत. दोन्ही गुडघे मुडपून त्यावर हाताच्या दंडांचा भार देत तो पंजावर बसला होता. त्याच्या हातावर, दंडावर, कपाळावर काळ्या, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या तीन समान रेघा होत्या. दाढीमिशांनी झाकलेला त्याचा अर्धवट चेहरा पांढऱ्या राखेनं माखला होता. एवढ्या थंडीतही त्याच्या अंगावर कमरेपासून गुडघ्यापर्यंतच्या धोतराखेरीज इतर काहीही नव्हतं. त्यानं डाव्या हाताच्या करंगळी आणि तर्जनीत धरलेली चिलीम तोंडाकडे नेली आणि डोळे मिटून एक लांबलचक झुरका घेतल्यासरशी चिलीम विस्तवाने फुलून गेली. पुढे कितीतरी वेळ तसाच शून्यात बघत कधी नाकातून कधी तोंडातून आळीपाळीने धूर काढू लागला.
काकानं असह्य होऊन विचारलं,"यावं का व बुवा?", बुवा गप्पच.
आता मात्र हद्दच झाली. कोणच काही बोलत नव्हतं. शेवटी कंटाळून अरविंदानं खांद्यावरची कळशी एकदम खाली ठेवली. तसा त्याचा तोल गेला आणि कळशी कलंडली. अर्ध पाणी बुवाच्या पायाखाली गेल. त्यानं नजर अरविंदावर रोखली. चिलमीच्या धूरानं लाल झालेल्या त्याच्या डोळ्यातलं पाणी चमकल. तशी त्यान चिलीम भिरकावली आणि कंदिल घेऊन वाऱ्याच्या वेगानं झोपडीत शिरला.
"दादू, आरं तुला झेपत नव्हती तर दत्ताकडं द्यायाची हुती, आता समदा घोळ घालून ठिवलास." दबक्या आवाजात काकाचा पारा चढला.
तेवढ्यात झोपडीतून आवाज आला." आप्पा, तुला एकल्याला बोलावला हुता मी, ही समदी इथ का म्हूण आणलीस? तुला इश्वास नसल तर नीघ आत्ताच्या आत्ता" बुवा चिडला होता,तो आमच्या तिघांना बघून.
"तस कायबी नाय बुवा, एक डाव घ्या समजून, पोरंच हायती ती", काका विनवणीच्या सुरात बोलला.
मी त्याचा हा आर्जवीपणा आयुष्यात प्रथमच पाहिला. मी पाहिला होता तो गावात आपला वचक आणि दरारा मिरवणारा पण माझे सगळे लाड पुरवणारा काका आता इथं कुठच नव्हता. होती ती फक्त हपापलेल्या मनाची क्षूद्र आर्जव आणि त्या क्षूद्र मनानं धारण केलेलं काकाच ठेंगण शरीर.
काहीतरी अस्पष्ट पुटपुटत बुवा झोपडीतून बाहेर आला. त्यानं हातात आणलेल्या पीठान झोपडीभोवती गोल रिंगण आखलं. डोळे मिटून मंत्र म्हणत पात्रातलं द्रव्य हवेत झिडकारलं. त्या द्रव्याचा उग्र वास दरवळला.
"तू एकल्यानचं आत चलायच, बाकीच्यानी ह्या पीठालाबी शिवायच नाय." काकाला अस निक्षून सांगत तो तरातरा आत निघून गेला.
कंदील माझ्याकडे देत काका म्हणाला, "गणा ती कोंबडन् कळशी आण इकडं, आन तिघबी त्या लिंबाखाली जा, मी यस्तवर हालू नका." एका हातात कोंबड्याची पिशवी आणि दुसऱ्या हातात कळशी घेऊन काका झोपडीत शिरला. काकाची वाट बघत आम्ही लिंबाखाली बसून राहिलो.
बराच वेळ उलटून गेला, झोपडीच दार बंदच होेतं. काही कळायला मार्ग नव्हता. परवा रात्रीची ट्रेन पकडून काल पहाटेच मी काकाच्या गावी आलो होतो. त्यानंतर काल झालेल्या गोठ्यातल्या धिंगाण्यानं सलग दोन रात्री डोळ्याला डोळा नव्हता. ट्रेनच्या इंजिनाचा आवाज अजून माझ्या कानात एकसारखा घुमत होता. त्या लहरी बुवाबरोबर काका एकटाच आत होता. त्याच्या काळजीनं माझ मन थाऱ्यावर नव्हतं.
"अरविंदा, खूप वेळ झाला रे, आपण जाऊन बघूया का एकदा?" मी विचारलं, अरविंदानं काळजीचा सूर पारखला, तो मिश्कीलपणे हसत बोलू लागला.
"दत्ता तू काळजी करु नको, आप्पांना काही नाय व्हायचं." तसे आम्ही दोघंही समवयस्की. काका अरविंदाचा बाप असला तरी त्याचा ओढा माझ्याकडेच जास्त असायचा. माझं आणि काकाच नातं एकेरी होतं. लहानपणापासून मी त्याला कधी आवंजावं केलच नव्हतं. याचा अर्थ मला त्याचा आदर नव्हता असा मुळीच नाही. पण त्या एकेरीपणात मला लाभणाऱ्या काकाच्या प्रेमाचा आनंद अरविंदाच्या वाट्याला कसा येणार?
"बुवाचा आदेश हाय, पीठाचं रिंगाण मोडता न्हाय यायचं, तसबी आपलं दाजी खमक हायती, तुमी नगा उगी काळजी करु." हातातली तंबाखू मळत गणानं अरविंदाला साथ दिली. त्यानं मळलेली तंबाखू ओठाआड केली.
"लाल्या हैबत्याची दादली शरात रावून चार बुक काय शिकली आली गावाला. दसऱ्याच्या वक्ताला सात मह्यन्याची बाळतिण हुती तवा आसाच रिंगणाला मोडता घातला तीनं, दोन महिनं कायबी झालं नाय, पर नव्व्या मह्यन्यात मेलंलं पोर निपाजलं." तपकिरी पिचकाऱ्या थुकत त्यान रिंगणाच्या गोष्टींचा धबाडकाच लावला. त्याच्या या गोष्टी ऐकण्यात मला काहीच रस नव्हता. हं हं करत मी फक्त त्या कानावर लादत होतो.
आता वारा थांबला होता, झाडं स्तब्ध होती. राहून राहून मी तोच प्रश्न त्या दोघांना विचारत होतो. त्या दोघांचीही उत्तर बदलत नव्हती. मला त्या उरफाट्या बुवाचा राग आला. त्या रागाच्या सपाट्यात ताडकन उठून मी पीठाच्या रिंगणाच्या दिशेने चालू लागलो. तशी ती दोघंही मला समजावित हाका मारु लागली. पण मला त्यातलं काहीच ऐकू येण्यासारखं नव्हतं कारण माझ्या कानात ट्रेनचं इंजिन थडथडत होतं, डोक्यात रात्रीच्या अर्धवट झोपेचा, करणीचा आणि बुवाच्या आडमूठेपणाचा राग सलत होता.
मी रिंगणात पाय ठेवणार तोच बुवा बाहेर आला, काकाही मागोमाग आला. तो तसाच वर आभाळात बघत सरळ माझ्याच दिशेने येऊ लागला. त्यानं हातातला विस्तव रिंगणाच्या पीठात टाकला तसा क्षणात पीठानं पेट घेतला. सरसर करत सारं रिंगण पेटलं. गणानं हात जोरात खेचून मला मागे ओढलं. मी धडपडतच जमिनीवर कोसळलो. उचलायच्या आशेनं मी गणा आणि अरविंदाकडं बघितलं, दोघंही गलितगात्र होऊन त्या आगीकडे बघत होते. कसंबसं उठत मी त्यांच्या नजरेच्या दिशेनं पाहीलं. समोरच दृश्य पाहून मीही क्षणभर स्तब्ध झालो. आगीच्या पिवळ्या ज्वाळेपलीकडे बुवाच्या डोळ्यातली काळी बुबळ गायब होती. काकानं पाय बांधलेला काळा कोंबडा पिशवीतून बाहेर काढत बुवाच्या हातात दिला. त्यानं तो पायाच्या बाजूनं उलटा धरला तसा तो जोरजोरात केकाटू लागला. तेवढ्यात बुवानं कनवटीचा सतुर काढून हवेत धरत गोल फिरवला. पुढच्याच क्षणी तसाच तो खाली भिरकावत कोंबड्याची मान धडावेगळी केली. त्या फडफडणाऱ्या धडातलं रक्त चौफेर उधळलं, उडालेली मान रिंगणाच्या आगीत पडली. बुवाच्या पांढऱ्याफिट्ट डोळ्याच्या कडा रक्तानं लाल झाल्या. त्या विचित्र आणि भयानक प्रकारानं मी जागच्या जागी सुन्न झालो. एवढ्या थंडीतही सर्वांग भिजून गेलं.
पेटत्या रिंगणाच्या आगीत पडलेलं कोंबड्याचं मुंडक टचटच आवाज करित ठिणग्या उडवत होतं. इकडे ठिणग्या वाढू लागल्या, तिथे तडफडणाऱ्या दुबळ्या धडाची हालचाल मंदावतं गेली. बुवाच्या हाताला एक जोराचा झटका देत शेवटी ते स्थिरावलं, शांत झालं, अगदी कायमच. बुवा गुडघ्यावर खाली बसत डोळे मिटून मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागला. त्याच्या विक्षिप्त मंत्राचे उच्चार डोंगरकपारीत घुमू लागले. त्याच दरदरून घामेजलेलं पीळदार शरीर आगीच्या पिवळ्या प्रकाशात चमकू लागलं. तसाच उठून माघारी फिरत, त्यानं हातातल धड काकाकडे भिरकावलं. ते फरफटत जाऊन काकाच्या पायात पडलं.
"आप्पा, ही घे. तुझ्या वाड्यामागच्या आंब्याखाली पूर. बाकी समद तुला ठाव हायच." बुवानं आज्ञा केली. पायातलं धड पिशवीत भरत काकानं मान हलवली.
तो झोपडीच्या दिशेने चालू लागला. झोपडीच्या दारात पोचताच तो थबकला. त्याची लाल चेहऱ्यावर प्रकट झालेली काळी बुबळ माझ्यावर स्थिरावली. तिच नजर पेटत्या रिंगणावर टाकत तो आत निघून गेला. क्षणार्धात ते पेटत रिंगण विझलं, ज्या वेगानं ते पेटलं त्याच वेगानं.
मला त्या बुबळांची भीती वाटली की ती ग्रहणात सूर्याला झाकोळणाऱ्या चंद्रासारखी आपल्याच कोण्या सग्यासोयऱ्याची प्रतिमा भासली हे माझं मलाच कळलं नाही. ती नजर नक्कीच माझ्या आयुष्यातल्या मला परिचित असणाऱ्या बऱ्याच ताऱ्यांपैकी एका ताऱ्याची लुकलुक असावी.