५ जून, २०२०

भाग ४- अरविंदा

करणी

       पहाटेे चार वाजले असतील. अचानक किंचाळण्याचा आवाज आला. गणा आणि मी खडबडून जागे होत आवाजाच्या दिशेने पळालो. माडीवरच्या खोलीत पायात डोक खुपसून बसलेल्या अरुणेच्या पाठीमागं आजी कानावर हात ठेवत डसाडसा रडत होती. मी पळत आजीकडं गेलो 
"काय झालं गं आजे?"
आजी रडक्या आवाजात बोलू लागली,"आर्, कुणी किली कसाबकरणी, वाटोळ् वाटोळ् हुईलं त्यजं"
"आगं पण झालं काय, सांगशिल का नायं" 
"बघ बघ, कशी दशा किली पोरीची, गरीब लेकरानंं काय बिगडावलं हुतं रं, ती आशी हेंगाडी करुन ठिवली, आईविना पोरं ती" हातातले अरुणेचे केस पुढं करत आजी कण्हू लागली. तिच्या केसांच्या अंबाड्याचा वेढा लचका तोडल्यासारखा कापला होता. मी अरुणेचे केस निरखून बघितले. तिचे खुरपटलेले बारीकमोठे केस पहावत नव्हते. ती तशीच बारीक आवाजात हुंदके देत रडत होती. 
              अरुणा तळहाताएवढी असताना आई देवाघरी गेली. तसा तिचा आणि माझा सांभाळ आजीनंच केला. आजी आता थकली होती. तिला होत नव्हतं तरी आम्हा दोघांसाठी घास तोडत जगत होती. मी अरुणेला समजावायला गेलो तशी ती माझ्या गळ्यात पडून आणखी रडली. 
           इकडे अरुणा शांत होते न होते तोच माळीतून धडाधड आवाज आला. 
"दादू माळीत जा. काय झाल बघं. मांजार उलाथलं आसनं तिकडं" आजी म्हणाली.
मी धावत जाऊन माळाच्या शिड्या चढून वर आलो. कोपऱ्यात रचलेल्या पोत्याच्या सगळ्या उतरंड्या ढासळल्या होत्या. फुटक्या गाडग्यांचे तुकडे चौफेर झाले होते. धान्यधुन्य, खतं, साठवणीचं सटरफटर चहूकडे उधळलं होतं. मांजर नाही की घुस नाही आणि उतरंडी कशा ढासळल्या? रांजणं कशी कलंडली? मला कशाचा काहीच पत्ता लागेना. तोवर गणा, आजी, अरुणा सारेच वरती आले. आजी कळवळली," आर् देवा, आता ही काय आनिक?" 
"गणा आर् बघतोस काय? कर गोळा सगळं" 
       आतापर्यंत घडलेली करणी वाड्यापुरतीच मर्यादित होती. तिची बाहेर वाच्छता नव्हती. त्याचदिवशी दुपारी अचानक पुन्हा उतरंडीच्या एकावर एक रचलेल्या पोत्यातलं मधलच पोत पेटलं. जळलेल्या ज्वारीचा करपा वास आणि धूर घरभर पसरु लागला. धूर बघून गावातील लोक पळत येऊ लागले. पाणी मारुन पोत विझवू लागले.  पोत विझवून झालही नसेल तोच तिकडं आप्पांच्या खोलीतल्या कापडं भरून ठेवलेल्या बंद ट्रंकेतून भसभस धूर निघू लागला. सारे भारी कपडे पेटले. कोरीकरकरीत धोतरं, जरीचे फेटे, खण, घडी न मोडलेली लुगडीं...आणि सगळं विझायच्या आत जळूनही गेलं.
           मधलच पोत कस पेटलं? ट्रंकेला आग कशी लागली? हा काय चमत्कार? गावात चर्चेला तोंड फुटलं.  
         दिवस बराच सरला. वाड्यात रोजचे व्यवहार घडले नाहीत. गोठ्यातल्या दावणीच्या गाई वैरणीवाचून धारेच्या राहिल्या. चूल पेटली नाही. केर काढला नाही. सारी मंडळी हवालदिल होऊन गेली. जळके कपडे, धान्य, गाडग्याची खापरे याचा खच झाला होता. आप्पा नसताना घरावर मोठा कठीण प्रसंग आला होता. अशावेळी सहानुभूती दाखवणं हे गावकऱ्यांच एक आवश्यक कर्तव्य होतं. रानामाळातून येत लोक वाड्याभोवती जमा झाले.
जी ती आईबाई येई, अरुणेचं भुंड डोक बघून हळहळे,"अगं आई आई! पोरीचं पार रुपाचं बेरुप झाल गं. कुणी मांत्र्यानं करणी केली काय वं"
जो तो दादानाना येई, जळकी कापडं, धान्य, खापरं बघून चुकचुके,"अरारा समदा इस्कूट झाला की वं, च्या मायला, आप्पा नसताना डाव धरुन करणी केल्याली दिसतीया"
           रात्रीच्या सुमारास आप्पा काखेत धोकटी अडकवून परगावाहून माघारी आले. आजीनं रडरडून सगळी तपशीलवार हकीगत आप्पांना सांगितली. वाड्यात झालेला सत्यानाश दाखवला. आप्पा धोकटी खुटीला अडकवून शांतपणे आजीला म्हणाले,"बरं हं आवर. पसारा का पडलाय घरात? दिस सरला तरीबी चूल पिटली नाय. उठ रं गणा. का बसलाया टकुर धरुन, गया सोड. वैराण घालून पाणी पाज जा. पोरखेळ सगळा. दादू आर् आवरा पसारा." 
           आप्पांच्या बोलण्यानं सगळेच धीरावले. जळकी पोती, खापऱ्या सगळं गोळा झालं. चूल पेटली, धार निघाली. सगळे जेवायला बसले. आप्पांनी भाकरीचा तुकडा तोंडात घातला आणि ते संतापले,"भाकरी पीठाच्या केल्यात का राखंच्या?" पण आप्पांखेरीज सगळ्यांना भाकरीची चव वेगळी लागली नाही. तेव्हा माझा ताटातला तुकडा मोडून तोंडात घातला. थू थू थू त्यालाही तिच चव.
          जेवण न करताच आप्पा जागचे उठले तोच वाड्याच्या अंगणात एक बचकेसारखा दगड येऊन दाणकन पडला. त्याच्या मागोमाग भिरीरी दगड येऊ लागले. दारावर भिंतीवर धाड धाड आदळू लागले. अंगणात बांधलेलं वासरु एका दगडासरशी पटकन खाली पडलं. पाय झाडू लागलं. आडोशाला ठेवलेल्या हंड्यावर एक धबका बसला. ठणकन् आवाज झाला. तशी आजी आमच्या दोघांना कवटाळत थरथर कापू लागली.
        सलग दोन तीन दिवस करणीचं चक्र घाना घालू लागलं. आप्पांनी गावात, वाड्यांत, पंचक्रोशीत सगळीकडं शोधाशोध केली. करणीची शहानिशा करत गावोगाव तपास केला. पोलिस केले, मांत्रिक केला, गुरव केला पण काही उपयोग झाला नाही. चौथ्या दिवशी दाढी मिशा वाढलेला एक धुरकट बुवा पीठ मागायला दारात आला. टोपलीत पीठ पडलं तरी इकडं तिकडं रखारखा बघत राहिला. वाड्याच्या कान्याकोपऱ्यातल्या जाळ्याजुळ्यांसकट सगळ्या वस्तू न्याहाळू लागला. झोपाळ्यावर बसलेल्या आप्पांना त्याच्या वागण्याचा धरगोळ कळला नाही. बराचं वेळ उभा राहिल्यावर तो आप्पांना म्हणाला. 
"घराला धनाची आस हाय, राखचा घास उलटायचा नसनं तर इलत्या आमवसेला रातच्याला कोंबडं घिऊन लिंब्याव एकांती भेट."
एवढच सांगून तो निघून गेला. आप्पा बुचकळ्यात पडले. काय हा विलक्षण माणूस? याला कस कळलं राखेचं? धनाची काय भानगड आहे? आनं कोंबडं कशापायी? यात काय फसवाफसवी डावसावं तर नसावा? तशीपण सगळी शोधाशोध झालीच आहे, कशानच गुण येईना. बघू तरी जाऊन.
              दुसऱ्या दिवशी पहाटे दत्ता अचानक सुट्टी काढून गावाला आला. मुंबईत त्याला नुकतीच नवी नोकरी मिळाली होती. त्यानं पत्रानं काहीएक न सांगता नोकरी लागल्याच कळवायला तो स्वत: घरी आला होता. त्याच्या त्या आनंदाच्या वार्तेनं वाड्यात दोन घटका सुखाच्या गेल्या.  हर्षभराच्या ऐन उन्मादात असलेल्या दत्ताला वाड्यातल्या करणीची करुण कहाणी ऐकवून कोणालाही त्याच्या आनंदावर विरजण घालायच नव्हतं. अरुणेनं डोक्याचे बोडके केसं टावेलानं घट्ट आवळून ताणून बांधले. दत्ताकडं बघत आप्पांनी चार घास डोळे मिचकावत बळेबळे खाल्ले. आजीनं कानाशी बोट मोडत कोट्यातली भीती तोंडावर न आणता दहावेळा दृष्ट काढल्या. गणा गणतीत नसल्यासारखा गोठ्यातच बसू लागला. मी मात्र घुम्यागत गप्प राहून हरएकवेळी त्याला टाळत राहीलो.
             घरातली माणसं तोंड मिटून गप्प बुजत राहीली पण लपेलं ती करणी कसली? रात्रीच्या अंधारात गोठ्यात राडा झाला. दगडाला लपेटलेल्या पेटत्या चुंबळी रपरप गोठ्यावर आदळू लागल्या. गया वासरं दावणीची सुटून सैरावैरा पळू लागली. वाळलेली वैरण ढणाढणा पेटली. बघता बघता आगीचा लोळ वाड्यापर्यंत पसरला. करणीचा फास आगीच्या दोरखंडानं आणखी घट्ट आवळू लागला. आप्पांनी बुवाकडं जायचं मनात पक्क केलं.

             

भाग ३- दत्ता

मळवटाचा तीळ

बारा तेरा वर्षे उलटल्यानंतरही गावातल्या सगळ्या गोष्टी अरविंदा मला अगदी जशाच्या तशा सांगायचा. मुंबईत काॅलेजात असल्यापासून त्याची पत्रे पंधरा दिवसाला हमखास यायची. त्यात गावातल्या पतीपासून सतीपर्यंतचा सगळा वृतांत असायचा. ती सगळी मी माझ्याजवळ जपून ठेवलीत. मीही त्याला होस्टेलच्या, काॅलेजच्या सगळ्या गमतीजमती पत्राने कळवायचो. बी काॅमच्या फस्ट इयरला असताना आमच्या होस्टेलमध्ये एक नवा सफाई कामगार रुजू झाला, माने आडनावाचा. काॅलेजमध्ये मिळणाऱ्या कमी वेतनामुळे आणि पोरांच्या नसत्या लफड्यांमुळे तसे कामगार महिन्यालाच बदलायचे. पण हा एक आमच्या लास्ट इयरपर्यंत टिकला. बोलीनं गावंढळ आणि अंगाखांद्यानं सडपातळ असला तरी तो मोठा करामती होता. पोरांच्या कलानं घेतलं की ती खूश राहतात हे त्याला ठाऊक होतं. पैशाच्या बाबतीत मिळेल तेवढ्यात तो समाधानी राहायचा. होस्टेलमध्ये सतत नवनवीन जादूचे प्रयोग करून थक्क करायचा.
          माने बैरागी आहे, त्याच्या उजव्या तळहातावर मधोमध हडळीच्या मळवटाचा लाल तीळ आहे, त्याला भुतं वश करायची शक्ती अवगत आहे. तो भुताला बोलवून जादूटोणा करतो त्याच्याबद्दल अशा काहीबाही अफवा होस्टेलमध्ये उठायचा. मलाही सुरुवातीला त्या खऱ्या वाटायच्या. पण असं मानेनं कधी स्वत:च्या तोंडानं सांगितलं नव्हतं.
        एकदा असेच आम्ही होस्टेलची तीनचार पोर आणि माने दोरखांबाच्या शेजारील कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो. 
बोलता बोलता रव्यानं त्याला विचारलं,"माने, तुमचा उजवा हात दाखवा बरं."
"का बरं, ज्युतीषी करतुस व्हय रं?" माने म्हणाला.
"तस नाय पण मी धन्याशी पैज लावली होती, मानेंचा उजवा हात खोलून दाखवतो म्हणून."
"तुजा डावं दिसतुय मला, पैजचं ढोंग कशापायी? असा दाकीवला असता की मी."
"माने, मग दाखवा की, कुणाची वाट बघताय." धन्याचा उत्साह वाढला.
"ही घे बग. त्यात काये येवड."
त्याच्या उजव्या तळहाताच्या मधोमध असलेला लाल तीळ बघून सारी पोरं हबकली आणि आपआपल्या जागेवर सवरुन बसली. ते बघून माने हसून म्हणाला.
"का रं पोरानो, यवड काय झालं दचकाया? का रं धन्या?"
सगळे गप्प. तेवढ्यात मी विचारलं,
"माने पोरं म्हणतात ते हाडळीच्या मळवटाचं खरं आहे का हो?" 
तो माझ्याकडे बघत गूढ हसला.
"ऐकायचयं व्हय तुमास्नी, ऐका तर मग" अस म्हणत खांबाचा आधार घेत सांगण्याच्या पवित्र्यात बसला.
"त्यज आस झालं, हाळणीच्या हाळदिवीची पालखी दर वरसाला आसतीया. दिवीचा नवस फेडाया दर वक्ताला जायाच म्हणत हुतो पर यळच हुत नव्हता. मनाला वरीसभर हुरहुर. पर यक दिस ठरावलं काय बी करुन जायाचं आन दिवीची उटी भरून नवस फेडायचा. आमच्या गावापास्न हाळणीपावतर नुसत्या झाडाझुडुपाची पांदीची वाट आन बाजूनं जंगाल. जाताना दिस व्हता आन पालखीची गर्दीबी बराबर हुती. पर ययच्या वक्ताला मला उशीर झाला. त्या जंगलाच्या पांदीनं मी यत हुतो तवा पाक आंधारभुडूक. जत्रतं कंदील आन थोडं घासल्याट इकत घेतलं हुत, तवा त्यनं पावलापुढलं त्यवड दिसायच. पर पल्ला लामचा हुता तवा मी बी लगबग चालत हुतो. 
             चालता चालता शेराच्या दाटवाणात आलो. त्या दाटवाणात चार आठ पावलं आत शिरलो तवाच बायांच्या बांगड्यागत किणकिण आवाज झाला. म्हून माग फिरुन बघतुया तवा म्होरं यक पांढऱ्या साडीतली बाय. चांगली गुरीपान आन सडपातळ. कपाळ कुकाच्या मळवटानं भरल्याल. तवाच मी वळीखलं ही काम यगळचं हाय गड्या. ती म्हणली मला बी त्या आंगाला जायाचयं, वाट दावता का जरा. मीबी घाबरत तयार झालो. ती माज्याबरं चालायला लागली. एक दोन मैल चाललू पर दोघबी चिडीचिप. भूत पाणी वलंडायच नाय ह्य मला ठाव हुत. तवा जसा वडा आला तसा मी ह्या हातानं तिजा मळवट पुसला आन वड्याच्या पल्याड जोरात पळत सुटलो. मग रक्ताच्या गुठळीगत ती कुकू साकाळलंन् त्यजा ह्यो ठिपका झाला. त्योच ह्यो मळवटाचा तीळ." 
तळहाताकडे बघत तो त्या मळवटाच्या लाल तीळावरुन बोट फिरवू लागला.
          माने उठून गेल्यावर रव्या म्हणाला,"माने खर सांगतो का रे आपल्याला?" 
बराच वेळ शांत बसलेला दिग्या म्हणाला,"अरे तस आमच्या गावातला नाथा आम्हाला सांगायचा. असा ज्याला हाताच्या मधोमध तीळ असतो त्याला भुतं वश होतात."
"अरे पण तीळाचा आणि भुताचा काय संबंध?" मी विचारलं.
"असा मळवटाचा तीळ असला ना की ते भुत आपल्या ताब्यात राहातं. त्या हाडळीचा नवरा अजून जिवंत असेल. तो कुंकवाचा तीळ मानेनं कायमचा काढू नये म्हणून ती त्याच्याकडे गयावया करतं असेल. त्या हाडळीला अस वाटत रहातं की त्यानं तीळ पाण्यानं धुतला की तो कायमचा पुसून जाईल आणि तिचा हयात असलेला नवरा मरेल. मग आपण त्या भुताला ब्लॅक मेल करायचं. म्हणायचं माझं हे काम कर, ते काम कर नाहीतर तीळाला पाणी लावतो, असं केलं की भुत सांगेल ते ऐकत. " दिग्या त्याची 'भुत' विषयावरची पीएचडी झाल्यासारखं सांगू लागला. मीही समोर भूत बघितल्यासारखं त्याच्याकडं पाहू लागलो.
            पुढे लास्ट इयरला असताना एक दिवस साफसफाईसाठी माने माझ्या रुममध्ये आला. मी एका कोपऱ्यात भिंतींना लागून असलेल्या टेबलावर धुऊन झालेली कपडे इस्त्री करून चापूनचोपून ठेवत होतो. माझ्या कॉटवरची तशीच पडलेली कागदं, पत्रे, पेन, वह्या सगळ त्यानं पटपट आवरायला सुरुवात केली. माझ त्याचाकडं जास्त लक्ष नव्हतं. मी माझ्या इस्त्रीच्याच नादात होतो. बराच वेळ झाला तरी झटकाझटकी, आधळआपट असा काहीच आवाज येत नाही, म्हणून मी मागे वळून बघितलं तर तो खाली मान घालून हुंदके देत रडत होता. मला आश्र्चर्य वाटलं. मी त्याला काही विचारायच्या आतच तो जागचा उठत जिन्याच्या दिशेनं चालू लागला. त्याला दोन तीन हाका दिल्या तरी तो तसाच चालत राहीला. कॉटवर बघितलं तेव्हा कागदं, पत्रं, वह्या सगळं तसच पडलं होतं. पत्राचं एक पान ओल झालं होतं, अक्षरं फिसकटली होती. अश्रूंच्या पांढऱ्या ठिपक्याला अक्षरांच्या शाईच्या निळ्या कडा डवरुन ते पत्र अगदी भकास दिसत होतं. कोणाच होतं ते पत्र? मी वाचलं होतं की नव्हतं? याचा काहीच विचार न करता मी सारं आवरुन घेतलं.
              त्या घटनेनंतर माने होस्टेलमध्ये बुजल्यासारखा वागू लागला. गप्प गप्प राहू लागला.
          

भाग १- दत्ता

रिंगण

             आम्ही बांधाच्या उजव्या बाजूने निघालो. आमावस्येच्या रात्रीचं शिशीरातलं आभाळाचं गोड चांदणं आज तिखट दिसत होतं. बोचणारी थंडी हाड गोठवत होती. गव्हाच्या वावरातून अर्धवट कापलेल्या बाजकानांवर झपझप पावलं उचलत नव्हती. खचाखच ती पायात मोडत सलत होती. सोसाट्याचा वारा, त्या वाऱ्याने कंदीलाची बत्ती फरफरायची. अरविंदा ठेचकळला की त्याच्या खांद्यावरल्या कळशीत पाण्याचा 'चुळ्ळ' आवाज व्हायचा. ती कळशी आम्ही दोघं आळीपाळीनं घ्यायचो. बघता बघता आम्ही पिंपळ्याचा ओढा गाठला. तेवढ्यात ओढ्याच्या विरुद्ध बाजूने एक काळी आकृती खाली सरकताना दिसली. वाळक्या पाल्याचा चपचप आवाज झाला. आम्ही दचकून जागीच थांबलो. 
तशी काकानं कंदीलाची बत्ती वाढवून हाक दिली, "कोण ए रं?"
"दाजी, आवं मी हाय!" हाकेला साद आली.
            ओढ्यात घुमल्यामुळे तो आवाज मला परिचित वाटला नाही. काकानं कंदीलाची बत्ती कमी केली. बघता बघता ती काळी आकृती आमच्या समोर आली. ती आता काळी न राहता बत्तीच्या उजेडानं उमटू लागली. गणा होता तो, काकाचा घरगडी. थोड्या वेळापूर्वी काकानं काहीतरी काम सांगून त्याला रात्री भेटायला सांगितलं होतं.
"गणा, आरं व्हता कुठं?"
"चांगलं सावज शोधाया उशीर झाला, पर आणलय ती यकदम बढीया हाय." तो हसत सांगू लागला.
"बरं बरं आणखी उशीर नगं, ए पाय उचला रं दोघ बी, चल गणा" असं म्हणत काका सोगा हातात घेत चालू लागला, आम्हीही मागोमाग निघालो. गणा माझ्या मागून चालू लागला, त्याच्या पिशवीत कसलीतरी खडबड होत होती. काका, अरविंदा, मी आणि गणा चौघेच. 
            निलवर्णी रात्र आता काळवर्णी होऊ लागली. पश्चिमेला लिंब्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत दुतर्फा गडद झाडी होती. काळोख गडद होऊ लागला तसा रातकिड्यांनी जोर धरला. रात्र बधिर झाली. आम्ही आता भरभर चालू लागलो. डोंगराचा चढ जाणवू लागला.  झाडांच्या गर्दीतून समोर वर पाहिले असता दिवसा तांबड्या वर्णाचा हिरव्या गर्द झाडीने मोहून टाकणारा लिंब्या काळाकभिन्न दिसत होता. जणू त्यानं मावळतीचा सूर्य आपल्या पोटात दडवून हे रात्रीच साम्राज्य उभ केल होत. ते राखायला तो स्वतः गस्त घालीत उभा होता. पायथ्यापासून पहिला कडा पार केल्यावर सपाटीला एक झोपडी दिसू लागली. त्याच्या डाव्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली कंदील घेऊन एक इसम बसला होता. काकांच्या मागून आम्ही तिघेही त्याच्या समोर आलो. ब्रम्हानंदी टाळी लागल्याप्रमाणे तो तसाच बसून होता, त्याच्याच तंद्रीत. दोन्ही गुडघे मुडपून त्यावर हाताच्या दंडांचा भार देत तो पंजावर बसला होता. त्याच्या हातावर, दंडावर, कपाळावर काळ्या, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या तीन समान रेघा होत्या. दाढीमिशांनी झाकलेला त्याचा अर्धवट चेहरा पांढऱ्या राखेनं माखला होता. एवढ्या थंडीतही त्याच्या अंगावर कमरेपासून गुडघ्यापर्यंतच्या धोतराखेरीज इतर काहीही नव्हतं. त्यानं डाव्या हाताच्या करंगळी आणि तर्जनीत धरलेली चिलीम तोंडाकडे नेली आणि डोळे मिटून एक लांबलचक झुरका घेतल्यासरशी चिलीम विस्तवाने फुलून गेली. पुढे कितीतरी वेळ तसाच शून्यात बघत कधी नाकातून कधी तोंडातून आळीपाळीने धूर काढू लागला. 
काकानं असह्य होऊन विचारलं,"यावं का व बुवा?", बुवा गप्पच. 
                आता मात्र हद्दच झाली. कोणच काही बोलत नव्हतं. शेवटी कंटाळून अरविंदानं खांद्यावरची कळशी एकदम खाली ठेवली. तसा त्याचा तोल गेला आणि कळशी कलंडली. अर्ध पाणी बुवाच्या पायाखाली गेल. त्यानं नजर अरविंदावर रोखली. चिलमीच्या धूरानं लाल झालेल्या त्याच्या डोळ्यातलं पाणी चमकल. तशी त्यान चिलीम भिरकावली आणि कंदिल घेऊन वाऱ्याच्या वेगानं झोपडीत  शिरला. 
"दादू, आरं तुला झेपत नव्हती तर दत्ताकडं द्यायाची हुती, आता समदा घोळ घालून ठिवलास." दबक्या आवाजात काकाचा पारा चढला. 
तेवढ्यात झोपडीतून आवाज आला." आप्पा, तुला एकल्याला बोलावला हुता मी, ही समदी इथ का म्हूण आणलीस? तुला इश्वास नसल तर नीघ आत्ताच्या आत्ता" बुवा चिडला होता,तो आमच्या तिघांना बघून.
"तस कायबी नाय बुवा, एक डाव घ्या समजून, पोरंच हायती ती", काका विनवणीच्या सुरात बोलला. 
मी त्याचा हा आर्जवीपणा आयुष्यात प्रथमच पाहिला. मी पाहिला होता तो गावात आपला वचक आणि दरारा मिरवणारा पण माझे सगळे लाड पुरवणारा काका आता इथं कुठच नव्हता. होती ती फक्त हपापलेल्या मनाची क्षूद्र आर्जव आणि त्या क्षूद्र मनानं धारण केलेलं काकाच ठेंगण शरीर. 
          काहीतरी अस्पष्ट पुटपुटत बुवा झोपडीतून बाहेर आला. त्यानं हातात आणलेल्या पीठान झोपडीभोवती गोल रिंगण आखलं. डोळे मिटून मंत्र म्हणत पात्रातलं द्रव्य हवेत झिडकारलं. त्या द्रव्याचा उग्र वास दरवळला.
"तू एकल्यानचं आत चलायच, बाकीच्यानी ह्या पीठालाबी शिवायच नाय." काकाला अस निक्षून सांगत तो तरातरा आत निघून गेला.
कंदील माझ्याकडे देत काका म्हणाला, "गणा ती कोंबडन् कळशी आण इकडं, आन तिघबी त्या लिंबाखाली जा, मी यस्तवर हालू नका." एका हातात कोंबड्याची पिशवी आणि दुसऱ्या हातात कळशी घेऊन काका झोपडीत शिरला. काकाची वाट बघत आम्ही लिंबाखाली बसून राहिलो. 
            बराच वेळ उलटून गेला, झोपडीच दार बंदच होेतं. काही कळायला मार्ग नव्हता. परवा रात्रीची ट्रेन पकडून काल पहाटेच मी काकाच्या गावी आलो होतो. त्यानंतर काल झालेल्या गोठ्यातल्या धिंगाण्यानं सलग दोन रात्री डोळ्याला डोळा नव्हता. ट्रेनच्या इंजिनाचा आवाज अजून माझ्या कानात एकसारखा घुमत होता. त्या लहरी बुवाबरोबर काका एकटाच आत होता. त्याच्या काळजीनं माझ मन थाऱ्यावर नव्हतं.
"अरविंदा, खूप वेळ झाला रे, आपण जाऊन बघूया का एकदा?" मी विचारलं, अरविंदानं काळजीचा सूर पारखला, तो मिश्कीलपणे हसत बोलू लागला.
"दत्ता तू काळजी करु नको, आप्पांना काही नाय व्हायचं." तसे आम्ही दोघंही समवयस्की. काका अरविंदाचा बाप असला तरी त्याचा ओढा माझ्याकडेच जास्त असायचा. माझं आणि काकाच नातं एकेरी होतं. लहानपणापासून मी त्याला कधी आवंजावं केलच नव्हतं. याचा अर्थ मला त्याचा आदर नव्हता असा मुळीच नाही. पण त्या एकेरीपणात मला लाभणाऱ्या काकाच्या प्रेमाचा आनंद अरविंदाच्या वाट्याला कसा येणार?
"बुवाचा आदेश हाय, पीठाचं रिंगाण मोडता न्हाय यायचं, तसबी आपलं दाजी खमक हायती, तुमी नगा उगी काळजी करु." हातातली तंबाखू मळत गणानं अरविंदाला साथ दिली. त्यानं मळलेली तंबाखू ओठाआड केली. 
"लाल्या हैबत्याची दादली शरात रावून चार बुक काय शिकली आली गावाला. दसऱ्याच्या वक्ताला सात मह्यन्याची बाळतिण हुती तवा आसाच रिंगणाला मोडता घातला तीनं, दोन महिनं कायबी झालं नाय, पर नव्व्या मह्यन्यात मेलंलं पोर निपाजलं." तपकिरी पिचकाऱ्या थुकत त्यान रिंगणाच्या गोष्टींचा धबाडकाच लावला. त्याच्या या गोष्टी ऐकण्यात मला काहीच रस नव्हता. हं हं करत मी फक्त त्या कानावर लादत होतो.
            आता वारा थांबला होता, झाडं स्तब्ध होती. राहून राहून मी तोच प्रश्न त्या दोघांना विचारत होतो. त्या दोघांचीही उत्तर बदलत नव्हती. मला त्या उरफाट्या बुवाचा राग आला. त्या रागाच्या सपाट्यात ताडकन उठून मी पीठाच्या रिंगणाच्या दिशेने चालू लागलो. तशी ती दोघंही  मला समजावित हाका मारु लागली. पण मला त्यातलं काहीच ऐकू येण्यासारखं नव्हतं कारण माझ्या कानात ट्रेनचं इंजिन थडथडत होतं, डोक्यात रात्रीच्या अर्धवट झोपेचा, करणीचा आणि बुवाच्या आडमूठेपणाचा राग सलत होता.
           मी रिंगणात पाय ठेवणार तोच बुवा बाहेर आला, काकाही मागोमाग आला. तो तसाच वर आभाळात बघत सरळ माझ्याच दिशेने येऊ लागला. त्यानं हातातला विस्तव रिंगणाच्या पीठात टाकला तसा क्षणात पीठानं पेट घेतला. सरसर करत सारं रिंगण पेटलं. गणानं हात जोरात खेचून मला मागे ओढलं. मी धडपडतच जमिनीवर कोसळलो. उचलायच्या आशेनं मी गणा आणि अरविंदाकडं बघितलं, दोघंही गलितगात्र होऊन त्या आगीकडे बघत होते. कसंबसं उठत मी त्यांच्या नजरेच्या दिशेनं पाहीलं. समोरच दृश्य पाहून मीही क्षणभर स्तब्ध झालो. आगीच्या पिवळ्या ज्वाळेपलीकडे बुवाच्या डोळ्यातली काळी बुबळ गायब होती. काकानं पाय बांधलेला काळा कोंबडा पिशवीतून बाहेर काढत बुवाच्या हातात दिला. त्यानं तो पायाच्या बाजूनं उलटा धरला तसा तो जोरजोरात केकाटू लागला. तेवढ्यात बुवानं कनवटीचा सतुर काढून हवेत धरत गोल फिरवला. पुढच्याच क्षणी तसाच तो खाली भिरकावत कोंबड्याची मान धडावेगळी केली. त्या फडफडणाऱ्या धडातलं रक्त चौफेर उधळलं, उडालेली मान रिंगणाच्या आगीत पडली. बुवाच्या पांढऱ्याफिट्ट डोळ्याच्या कडा रक्तानं लाल झाल्या. त्या विचित्र आणि भयानक प्रकारानं मी जागच्या जागी सुन्न झालो. एवढ्या थंडीतही सर्वांग भिजून गेलं. 
        पेटत्या रिंगणाच्या आगीत पडलेलं कोंबड्याचं मुंडक टचटच आवाज करित ठिणग्या उडवत होतं. इकडे ठिणग्या वाढू लागल्या, तिथे तडफडणाऱ्या दुबळ्या धडाची हालचाल मंदावतं गेली. बुवाच्या हाताला एक जोराचा झटका देत शेवटी ते स्थिरावलं, शांत झालं, अगदी कायमच. बुवा गुडघ्यावर खाली बसत डोळे मिटून मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागला. त्याच्या विक्षिप्त मंत्राचे उच्चार डोंगरकपारीत घुमू लागले. त्याच दरदरून घामेजलेलं पीळदार शरीर आगीच्या पिवळ्या प्रकाशात चमकू लागलं. तसाच उठून माघारी फिरत, त्यानं हातातल धड काकाकडे भिरकावलं. ते फरफटत जाऊन काकाच्या पायात पडलं.
"आप्पा, ही घे. तुझ्या वाड्यामागच्या आंब्याखाली पूर. बाकी समद तुला ठाव हायच." बुवानं आज्ञा केली. पायातलं धड पिशवीत भरत काकानं मान हलवली.
           तो झोपडीच्या दिशेने चालू लागला. झोपडीच्या दारात पोचताच तो थबकला. त्याची लाल चेहऱ्यावर प्रकट झालेली काळी बुबळ माझ्यावर स्थिरावली. तिच नजर पेटत्या रिंगणावर टाकत तो आत निघून गेला. क्षणार्धात ते पेटत रिंगण विझलं, ज्या वेगानं ते पेटलं त्याच वेगानं. 
मला त्या बुबळांची भीती वाटली की ती ग्रहणात सूर्याला झाकोळणाऱ्या चंद्रासारखी आपल्याच कोण्या सग्यासोयऱ्याची प्रतिमा भासली हे माझं मलाच कळलं नाही. ती नजर नक्कीच माझ्या आयुष्यातल्या मला परिचित असणाऱ्या बऱ्याच ताऱ्यांपैकी एका ताऱ्याची लुकलुक असावी.                   

पत्राची मागची बाजू

पत्राची मागची बाजू

     "बैतोबानं कौल दिला बरं का. आन हो तीळ मळवटाचा न्हाय, त्यो जलमजातच हाय मला."
                                                                                                                 तान्या माने

रोष

रोष

        दत्तानं हातातलं पत्र खिशात घातलं. अरविंदा कुठंच दिसत नव्हता. त्यानं वाड्याच्या आजूबाजूच्या खोल्या चाचपल्या. माडी बघून आला. तेवढ्यात मागं परसाच्या बाजूला लांबून कोठून तरी खटखट आवाज येऊ लागला. तो धावत आवाजाच्या दिशेनं गेला. अरविंदा झाडाआड उभा होता. समोर काका कुदळीनं खणत होता. 
        इकडं ठो आवाज करत आगीचे भलेमोठे गोळे वाड्यावर पडू लागले. गोठ्यावर पडलेल्या गोळ्यांपेक्षा ते दसपटीनं मोठे होते. क्षणार्धात वाडा पेटला, अगदी चारी बाजूंनी. गावात हाहाकार उडाला. सगळे लोकं वाड्याकडं पळत येऊ लागले तरी गोळे पडतच राहीले. काही लोकं काकाकडं आली. त्याला सांगू लागली, समजावू लागली तरी काका खणतच राहीला. पेटलेल्या गोळ्यांचा रोष आणि आकार बघून त्यातल्या एकाही जणाची पुढं यायची धडगत झाली नाही. जणू ते बैतोबाचा कौल होऊन छळलेल्या सुखवास्तूंच्या अग्नीरुपानं बरसत होते. वाड्याच छत कोसळल्यावर गोळे येणं बंद झालं. लोकं जमून पाणी ओतायच्या आतच वाड्याचा पार चुराडा झाला. राख झाली. 
               गावाचा आप्पा आणि दत्ताचा काका दुसऱ्या कुरकुडीची फुलं शोधू लागला. पाणी शिंपडू लागला. रंग बघू लागला. पांढऱ्या फुलाच्या कुरकुड्या लाल झाल्या.


....दत्तानं खिशातलं पत्र बाहेर काढत अरविंदाच्या हातात ठेवलं. पत्राचा मागचा मजकूर बघून त्यानं दीर्घ श्वास घेतला.
          

अरविंदाचं पत्र

अरविंदाचं पत्र

"आभास सावली हा असतो खरा प्रकाश

जे सत्य भासती ते असती नितांत भास

हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा

संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा खेळ सावल्यांचा"

आज सुरुवात नक्की कशानं करावी तेच सुचत नव्हतं. शेवटी खिडकीच्या डाव्या बाजूच्या देवळीतल्या तू आणलेल्या रेडिओनं मदत केली. सुधीर मोघेंचे शब्द वळीव पावसाच्या थेबांसारखे संगीतरुपाने भरभर अंगावर कोसळले. ते मनात आसुसलेल्या कोरड्या मातीच्या उष्ण कुशीत शिरत लेखणीतल्या शाईला वेग देऊ लागले. मग कागद हाती घेतला आणि शब्दरुपी शाईला अक्षररुपी वळण देऊन तो कागद पत्ररुपाने तुला सुपूर्द केला.
                कवी लेखकांना लाभलेल्या प्रतिभेच्या वरदानासमवेत अनुभवाची तपस्याच जास्त पूर्णत्व बहाल करते. आता हेच बघ ना मोघेंच्या कवितेतले 'सावलीला हसणारे आंधळे' आपण सारेच आहोत नाही का?
                तान्या मला आजही आठवतो. ती घटना मी तुला सांगितली असेल, जी मी स्वत: डोळ्यांनी पाहिली, कानाने ऐकलेल्यांची तर गणतीच करवत नाही. आपले आप्पा खरंच असे असतील? तान्याकडून त्याच्याच पदरचे पाच दहा पैसे उकळून काय सुख मिळाल असेल त्यांना? तो निघून गेल्यावर त्याच्या घराची झालेली वाताहत यांना उघड्या डोळ्यांनी कशी पेलवली? बायको तर आधीच गेलेली. तान्याची आई सजा वाणीण काल गेली. ती उलट्या काळजाची असली तरी तिलाही जीव होताच की. सात आठ वर्षं तळमळलेला तिचा जीव. किती शापांचं विष साठलं असेल त्या जीवात? तान्याचे पैसे घेऊनही यांच भागलं नाही, तो गेल्यावर यांनी 'तान्या पैसे न देता फरार झाला' अशी अफवा उठवत, म्हातारीवर कसलीतरी करणी केली. मग तिला वेडी ठरवून तान्याची ती जमिनही घशात घातली.
                 आता मधल्या आळीत त्याच्या पडलेल्या घरासमोरुन जाताना माझ मनं विषण्ण होतं. त्या निद्रीस्त वास्तूकडे पाहण्याची माझी हिंमतच होत नाही. वाटायला लागतं मी आजतागायत अशा सुखी वास्तू पायाखाली चिरडून वैभवाच्या पाटावर बसत त्यांच्याच वाट्याचे घास रिचवले. कोणीतरी हे रोखायला हवं. त्यांना त्यांच्याच शब्दात त्यांच्याच 'बैतोबाचा कौल' दाखवायला हवा.               

भाग ५- दत्ता

कुरकुडीची फुलं 

लिंब्यावरुन आल्यानंतर काकानं मला बुवाचा सगळा तपशील सांगितला. बुवाच्या मते ही करणी नव्हती ती अडकून पडलेल्या गुप्तधनाची पेटलेली छळवादी हाक होती. तो घरी पीठ मागायला आला असता त्याला ती जाणवली. तो म्हणत होता येणाऱ्या तीन रात्री वाड्यासाठी फारशा चांगल्या नाहीत. त्या रात्रीत घरातल्या कोणाही एकाच्या जीवावर बेतू शकत. तीन दिवस वाड्यातली कोणतीही वस्तू, कपडा, पैसा अगदी ज्वारीचा दाणाही हातात न बाळगता सगळ्यांनी कुठेतरी दूर जाऊन रहा. बुवा सांगेल तेव्हा काकाच फक्त त्यास भेटायला जातील.
         मला आणि अरविंदाला काकाचा निर्णय पटला नाही. कोण एक बुवा येतो? काहीबाही सांगतो? आपण लगेच त्याला हवं तसं का करायचं? करणीसाठी? छे, नाही, हा वाडा सोडून कुठंच जायचं नाही. पण घाबरलेल्या आजीनं मोडता घातल्यावर आम्हाला ते टाळणं शक्य नव्हतं. त्यानं सांगितल्यासारखं आम्ही तीन दिवस शेजारच्या वाडीतल्या छोट्या घरात राहायला गेलो. पण तो विक्षिप्त बुवा जेव्हा जेव्हा काकाला बोलवेल तेव्हा आपण काकामागं गुपचूप जायचं, असं आम्ही दोघांनीही ठरवलं. लिंब्यावरचं त्याचं ते भयानक रुपडं बघून आम्ही पुरते भ्यालो होतो.
           दुसऱ्याच दिवशी काकाला बुवाचं बोलावणं आलं. मध्यरात्री सगळं चिडीचूप झाल्यावर काका बुवाकडं जायला निघाला. आज अचानक झालेल्या अवपाडी पावसानं रस्त्यावर चिखल धरुन पाणी साठलं होतं. तसला चिखल तुडवत काका वाडीच्या मधल्या वाटेनं थेट लिंब्याच्या दिशेनं चालू लागला. त्याला कुणकुण लागू न देता आम्ही पाठोपाठ निघालो. वर आभाळात हलकं चांदणं पडलं होतं. त्याच्या मंद प्रकाशात आजूबाजूला फुललेली रातराणी वाऱ्याच्या मिलनानं दरवळत खुलतं होती. तिचा पसारा दूरवर नेत वारा थयथय नाचत होता. चिखलानं रेडबडलेल्या पायानिशी काका बुवाच्या झोपडीबाहेर पोचला. त्यानं इकडं तिकडं बघत शहानिशा केली आणि आत शिरला.
         तो आत गेल्यावर आम्ही पहिला कडा चढून वर आलो. धावतच झोपडीच्या पाठीमागं शिरलो. ताटीचं एखादं बारीक छिद्र शोधलं पण ते कुठं सापडलच नाही. त्या झोपडीची प्रत्येक ताटी एका विशिष्ट पद्धतीनं बांधली होती. शेवटी झोपडीच्या मागच्या कोपऱ्यात कान लावून दोघही खाली बसलो. बराच वेळ आतून कसलाच आवाज येईना.  अचानक बुवाचा आवाज आला,"हकडं इताना कुणी बगितलं नाय न"
"न्हाय"
"मी बोलावलय ती घराकडं कुणाला बोलला न्हायस नव"
"न्हाय"
"बरं मी सांगतू ती नीट ऐक, तुझ्या नशिबात अपरंपार धन हाय. सोन्याच्या मोहरानी भरल्याल हंडं हायत, रांजण हाय. तुझ्या परसाला आंब्यापासन हिरीपावतर चर खणलाया ती तुजी लक्ष्मणरेखा. चल य बाहीर."
ते आतून बाहेर येईपर्यंत आम्ही एका उंच शिळेमागं जाऊन लपलो. 
       दोघंही झोपडीतून बाहेर आले. बुवाच्या हातात त्यादिवशी आणलेली कळशी होती. काका दिव्याचा टेंभा घेऊन उजेड दाखवत बुवाच्या मागून आला. बुवानं उजव्या हातातली कळशी डाव्या हाती घेत मंत्र पुटपुटले. उजवा हात पुढे करत अर्ध्य दिल्यासारखं त्यानं कळशीतलं पाणी तळहातावर सोडलं. क्षणार्धात मी जागेवरच थरथरलो. सारं अंग शहारून त्यातून काटे फुटू लागले. त्या काट्यांच्या सूक्ष्म छिद्रांतून रसरसणाऱ्या स्वादोदकानं मी जागच्या जागी भिजून गेलो. 
       अगदी तसाच लाल तीळ. तसल्याच मळवटाचा. तळहाताच्या एकदम मधोमध. कळशीतल्या पाण्याच्या मंद धारेनं तो चमकत होता. कळशी काकाच्या हातात देत तो सांगू लागला,
"आप्पा ही घे, ही साध पाणी नव्हं. हीरीच्या दिशेन गेल्यावं चराच्या उजव्या हाताला चालत जा. फुलं आल्यालं कुरकुडीचं गवात शोध. त्यजा हरएक फुलावं ही पाणी शिपीडं. ह्या पाण्यानं जी फुल पांढऱ्याच लाल व्हयलं त्यजा खाली खणून बग. खणनं तशा आडव्या पहारी लागत्याल. त्यला साखळदंड बांधून धनाचं रांजण आडकावलयं. जवा तुला ती सापडनं तवाच घरावल्या करण्या टळत्यालं. पर ही समद रातच्यालाच व्हया पायजी. हा आनी यक, हीतनं पुढं मला शोधाय लिंब्यावं यीव नगं."
अस म्हणत त्यानं शिळेकडं बघितलं. लगेच आम्ही अंगं आकसून शिळेच्या मागं दडलो. 
          तिच नजर, तोच आवाज, तसलाच तीळ, तसलेच जादूचे प्रयोग आणि पत्र? हो, ते पत्र तसंच माझ्या बॅगेत असेल. अरविंदाची सगळी पत्रं माझ्या संग्रही होती. वाडीला रहायला जाताना माझ्या सगळ्या बॅगा वाड्यातच होत्या. काका कळशी घेऊन शिळेच्या बाजूनं गेले. अरविंदानं दोन तीन वेळा हलवल्यावर मी भानावर आलो. "अरविंदा, चल माझ्याबरोबर."
"कुठं?"
"आपल्या गावातल्या घराकडं. चल पळ पटकनं"
"आर् पर घरात जाऊन काय वेगळच घडलं तर"
"काय नाय होत चल"
      वाड्यात आत आलो. दिवा लावला. बॅग दारातच पडली होती. मी पळत जाऊन बॅग खोलली. बॅगेतलं सगळ जिथल्या तिथं होतं. पत्राच्या गठ्ठ्यातून फिसकटलेलं निळसर पत्र बाहेर काढलं. 

भाग ४- अरविंदा

करणी

       पहाटेे चार वाजले असतील. अचानक किंचाळण्याचा आवाज आला. गणा आणि मी खडबडून जागे होत आवाजाच्या दिशेने पळालो. माडीवरच्या खोलीत पायात डोक खुपसून बसलेल्या अरुणेच्या पाठीमागं आजी कानावर हात ठेवत डसाडसा रडत होती. मी पळत आजीकडं गेलो 
"काय झालं गं आजे?"
आजी रडक्या आवाजात बोलू लागली,"आर्, कुणी किली कसाबकरणी, वाटोळ् वाटोळ् हुईलं त्यजं"
"आगं पण झालं काय, सांगशिल का नायं" 
"बघ बघ, कशी दशा किली पोरीची, गरीब लेकरानंं काय बिगडावलं हुतं रं, ती आशी हेंगाडी करुन ठिवली, आईविना पोरं ती" हातातले अरुणेचे केस पुढं करत आजी कण्हू लागली. तिच्या केसांच्या अंबाड्याचा वेढा लचका तोडल्यासारखा कापला होता. मी अरुणेचे केस निरखून बघितले. तिचे खुरपटलेले बारीकमोठे केस पहावत नव्हते. ती तशीच बारीक आवाजात हुंदके देत रडत होती. 
              अरुणा तळहाताएवढी असताना आई देवाघरी गेली. तसा तिचा आणि माझा सांभाळ आजीनंच केला. आजी आता थकली होती. तिला होत नव्हतं तरी आम्हा दोघांसाठी घास तोडत जगत होती. मी अरुणेला समजावायला गेलो तशी ती माझ्या गळ्यात पडून आणखी रडली. 
           इकडे अरुणा शांत होते न होते तोच माळीतून धडाधड आवाज आला. 
"दादू माळीत जा. काय झाल बघं. मांजार उलाथलं आसनं तिकडं" आजी म्हणाली.
मी धावत जाऊन माळाच्या शिड्या चढून वर आलो. कोपऱ्यात रचलेल्या पोत्याच्या सगळ्या उतरंड्या ढासळल्या होत्या. फुटक्या गाडग्यांचे तुकडे चौफेर झाले होते. धान्यधुन्य, खतं, साठवणीचं सटरफटर चहूकडे उधळलं होतं. मांजर नाही की घुस नाही आणि उतरंडी कशा ढासळल्या? रांजणं कशी कलंडली? मला कशाचा काहीच पत्ता लागेना. तोवर गणा, आजी, अरुणा सारेच वरती आले. आजी कळवळली," आर् देवा, आता ही काय आनिक?" 
"गणा आर् बघतोस काय? कर गोळा सगळं" 
       आतापर्यंत घडलेली करणी वाड्यापुरतीच मर्यादित होती. तिची बाहेर वाच्छता नव्हती. त्याचदिवशी दुपारी अचानक पुन्हा उतरंडीच्या एकावर एक रचलेल्या पोत्यातलं मधलच पोत पेटलं. जळलेल्या ज्वारीचा करपा वास आणि धूर घरभर पसरु लागला. धूर बघून गावातील लोक पळत येऊ लागले. पाणी मारुन पोत विझवू लागले.  पोत विझवून झालही नसेल तोच तिकडं आप्पांच्या खोलीतल्या कापडं भरून ठेवलेल्या बंद ट्रंकेतून भसभस धूर निघू लागला. सारे भारी कपडे पेटले. कोरीकरकरीत धोतरं, जरीचे फेटे, खण, घडी न मोडलेली लुगडीं...आणि सगळं विझायच्या आत जळूनही गेलं.
           मधलच पोत कस पेटलं? ट्रंकेला आग कशी लागली? हा काय चमत्कार? गावात चर्चेला तोंड फुटलं.  
         दिवस बराच सरला. वाड्यात रोजचे व्यवहार घडले नाहीत. गोठ्यातल्या दावणीच्या गाई वैरणीवाचून धारेच्या राहिल्या. चूल पेटली नाही. केर काढला नाही. सारी मंडळी हवालदिल होऊन गेली. जळके कपडे, धान्य, गाडग्याची खापरे याचा खच झाला होता. आप्पा नसताना घरावर मोठा कठीण प्रसंग आला होता. अशावेळी सहानुभूती दाखवणं हे गावकऱ्यांच एक आवश्यक कर्तव्य होतं. रानामाळातून येत लोक वाड्याभोवती जमा झाले.
जी ती आईबाई येई, अरुणेचं भुंड डोक बघून हळहळे,"अगं आई आई! पोरीचं पार रुपाचं बेरुप झाल गं. कुणी मांत्र्यानं करणी केली काय वं"
जो तो दादानाना येई, जळकी कापडं, धान्य, खापरं बघून चुकचुके,"अरारा समदा इस्कूट झाला की वं, च्या मायला, आप्पा नसताना डाव धरुन करणी केल्याली दिसतीया"
           रात्रीच्या सुमारास आप्पा काखेत धोकटी अडकवून परगावाहून माघारी आले. आजीनं रडरडून सगळी तपशीलवार हकीगत आप्पांना सांगितली. वाड्यात झालेला सत्यानाश दाखवला. आप्पा धोकटी खुटीला अडकवून शांतपणे आजीला म्हणाले,"बरं हं आवर. पसारा का पडलाय घरात? दिस सरला तरीबी चूल पिटली नाय. उठ रं गणा. का बसलाया टकुर धरुन, गया सोड. वैराण घालून पाणी पाज जा. पोरखेळ सगळा. दादू आर् आवरा पसारा." 
           आप्पांच्या बोलण्यानं सगळेच धीरावले. जळकी पोती, खापऱ्या सगळं गोळा झालं. चूल पेटली, धार निघाली. सगळे जेवायला बसले. आप्पांनी भाकरीचा तुकडा तोंडात घातला आणि ते संतापले,"भाकरी पीठाच्या केल्यात का राखंच्या?" पण आप्पांखेरीज सगळ्यांना भाकरीची चव वेगळी लागली नाही. तेव्हा माझा ताटातला तुकडा मोडून तोंडात घातला. थू थू थू त्यालाही तिच चव.
          जेवण न करताच आप्पा जागचे उठले तोच वाड्याच्या अंगणात एक बचकेसारखा दगड येऊन दाणकन पडला. त्याच्या मागोमाग भिरीरी दगड येऊ लागले. दारावर भिंतीवर धाड धाड आदळू लागले. अंगणात बांधलेलं वासरु एका दगडासरशी पटकन खाली पडलं. पाय झाडू लागलं. आडोशाला ठेवलेल्या हंड्यावर एक धबका बसला. ठणकन् आवाज झाला. तशी आजी आमच्या दोघांना कवटाळत थरथर कापू लागली.
        सलग दोन तीन दिवस करणीचं चक्र घाना घालू लागलं. आप्पांनी गावात, वाड्यांत, पंचक्रोशीत सगळीकडं शोधाशोध केली. करणीची शहानिशा करत गावोगाव तपास केला. पोलिस केले, मांत्रिक केला, गुरव केला पण काही उपयोग झाला नाही. चौथ्या दिवशी दाढी मिशा वाढलेला एक धुरकट बुवा पीठ मागायला दारात आला. टोपलीत पीठ पडलं तरी इकडं तिकडं रखारखा बघत राहिला. वाड्याच्या कान्याकोपऱ्यातल्या जाळ्याजुळ्यांसकट सगळ्या वस्तू न्याहाळू लागला. झोपाळ्यावर बसलेल्या आप्पांना त्याच्या वागण्याचा धरगोळ कळला नाही. बराचं वेळ उभा राहिल्यावर तो आप्पांना म्हणाला. 
"घराला धनाची आस हाय, राखचा घास उलटायचा नसनं तर इलत्या आमवसेला रातच्याला कोंबडं घिऊन लिंब्याव एकांती भेट."
एवढच सांगून तो निघून गेला. आप्पा बुचकळ्यात पडले. काय हा विलक्षण माणूस? याला कस कळलं राखेचं? धनाची काय भानगड आहे? आनं कोंबडं कशापायी? यात काय फसवाफसवी डावसावं तर नसावा? तशीपण सगळी शोधाशोध झालीच आहे, कशानच गुण येईना. बघू तरी जाऊन.
              दुसऱ्या दिवशी पहाटे दत्ता अचानक सुट्टी काढून गावाला आला. मुंबईत त्याला नुकतीच नवी नोकरी मिळाली होती. त्यानं पत्रानं काहीएक न सांगता नोकरी लागल्याच कळवायला तो स्वत: घरी आला होता. त्याच्या त्या आनंदाच्या वार्तेनं वाड्यात दोन घटका सुखाच्या गेल्या.  हर्षभराच्या ऐन उन्मादात असलेल्या दत्ताला वाड्यातल्या करणीची करुण कहाणी ऐकवून कोणालाही त्याच्या आनंदावर विरजण घालायच नव्हतं. अरुणेनं डोक्याचे बोडके केसं टावेलानं घट्ट आवळून ताणून बांधले. दत्ताकडं बघत आप्पांनी चार घास डोळे मिचकावत बळेबळे खाल्ले. आजीनं कानाशी बोट मोडत कोट्यातली भीती तोंडावर न आणता दहावेळा दृष्ट काढल्या. गणा गणतीत नसल्यासारखा गोठ्यातच बसू लागला. मी मात्र घुम्यागत गप्प राहून हरएकवेळी त्याला टाळत राहीलो.
             घरातली माणसं तोंड मिटून गप्प बुजत राहीली पण लपेलं ती करणी कसली? रात्रीच्या अंधारात गोठ्यात राडा झाला. दगडाला लपेटलेल्या पेटत्या चुंबळी रपरप गोठ्यावर आदळू लागल्या. गया वासरं दावणीची सुटून सैरावैरा पळू लागली. वाळलेली वैरण ढणाढणा पेटली. बघता बघता आगीचा लोळ वाड्यापर्यंत पसरला. करणीचा फास आगीच्या दोरखंडानं आणखी घट्ट आवळू लागला. आप्पांनी बुवाकडं जायचं मनात पक्क केलं.

             

भाग २- अरविंदा

कर्जाचा बोजा

गीर वस्तीतल्या बजाबाला बोलवून मी उसासे टाकतच बैतोबाच्या देवळापाशी पोचलो. देवळाच्या पुढच्या बाजूला गावातली बरीचं पुरुष मंडळी जमली होती. पाटील देशमुख, इनामदार आणि सरपंच आप्पा अशी प्रतिष्ठीत मंडळी चौथऱ्यावर मांड्या घालून बसली होती. त्यांच्या उजव्या बाजूला मधल्या आळीची तान्या वाघाची भाल्यासारखी उंच म्हातारी सजा वाणीण उभी राहून हातवारेे करत मोठमोठ्याने बडबडत होती. तिच्या माग तान्याची बायको कमरेवर हात देत उभी होती. डोळे गरगर फिरवत ती कुणालातरी शोधत होती. तान्या मात्र त्या दोघींच्या मागं दगडावर दात पोखरीत एकटाच शांत बसला होता. जणू या प्रकरणाशी त्याच काहीच देणंघेणं नव्हतं. मी तिथे पोचताच धोतराचा सोगा हातात धरत चौथऱ्यावरुन उतरुन आप्पांनी विचारलं,"बजा कुठायं रं?"
"मळ्यात होता, पायाव पाणी घेऊन येतोच म्हणला"
"लगोलग हीकडच आणायचा न्हायस व्हय मळ्यास्न?"
तेवढ्यात हातात काठी घेऊन अंधारातून चालत आलेला बजाबा मला दिसला. 
"तबघा आलाचं तो" म्हणत मी बोटानं दाखवलं.
आज तान्या आणि बजाबाच्या जमिनीचा निवाडा बैतोबाच्या आणाभाका घेऊन गावाच्या साक्षीनं होणार होता. 
         तान्या गरीब होता, अनपढ होता. दहा पांड जमिनीचा तुकडा आणि एक दुभत जनावर एवढाच त्याचा प्रपंच. आडनावाचाच वाघ पण बोलीचालीला, स्वभावाला मवाळ असणारा तान्या वाळक्या पाचोळ्यावर पाय न देणारा होता. घराच्या छोट्या खोलीत किराणा मालाचं दुकान काढून गूळ, तेल, मीठ, शेंगदाणं विकणारी त्याची म्हातारी आई सजा वाणीण आपल्या मिळकतीतला एक नया छदामही त्याला देत नव्हती. तंबाखू खायची झाली तरी म्हातारीकडे त्याला पैसे मोजावे लागत. उलट शहरातल्या वाण्याकडून दुकानात भरलेल्या मालाची उधारी तान्याच्या नावावर मांडून ती बिनबोभाट धंदा करत असे. अशा अप्पलपोटी सजा वाणीणीची सून, तान्याची बायकोही मोठी हरामदख्याली होती. गावच्या सोनारवाड्यात तिच सारख जाणयेणं होतं. शे- दोनशे रुपयाची लुगडी फाडून, दिवसातनं दहा कप चहा पिऊन ती बामणाच्या माणसांसारखी झ्याकीत राहायची. सूनेवर तोंड टाकायला गेलेल्या सजा वाणीणीचे दोन्ही हात धरून तिनं चार गालफाडावर ठेवून दिल्या होत्या. तेव्हापासनं तान्याही तिला भिऊन असायचा. म्हातारी आणि बायकोच्या अशा मनमानी वागण्यामुळं तान्या खंगत चालला होता. कर्जाचा बोजा आणि वरची सगळी देणी भागवायच्या काळजीनं तो अगदी मेटाकुटीला आला होता.
          कर्जापायी अशा कलागती बायकांचा विचार न घेता शेवटी त्यानं गीर वस्तीतली जमीन विकायच ठरवलं. ती जमीन बजाबाच्या वावराला लागूनच होती. बजाबालाही ती हवी होती पण तान्या तयार होत नव्हता. आता आयती संधी चालून आल्यावर बजाबाला ती सोडायची नव्हती. तान्याशी ठराव करून त्यानं जमीनीची इसार पावती करुन घेतली. अंगठा उठवून दहा हजार रुपये बंडीत घालत तान्या घरी आला. घरी पोचताच तिथला प्रकार पाहून त्याची दातखिळच बसली. त्या दोघींना कुठून कुणकुण लागली कळलं नाही. म्हातारीनं आढ्याला दोर लावून फास तयार केला आणि बायको अंगावर रॉकेल ओतून घेऊ लागली. त्यानं दारात पाय ठेवताच दोघींनीही गहिवर घातला. घटकाभरातच सारा गाव जमला, सगळ्यांनी तमाशा बघितला. शेवटी चार जाणत्या माणसांनी पुढ होत त्या दोघींची समजूत घातली.
       इसार पावती रद्द करायला तान्या बजाबाकडं गेला पण तो कुठंतरी गावाला गेलाय आणि आठवडाभर येणार नाही अस कळलं. त्या दिवसापासून दोघींनीही तान्याला धारेवर धरलं. कुठून बुद्धी झाली आणि हा उद्योग करुन बसलो अस तान्याला झालं. आठवडाभरानं इसार रद्द करायला तो बजाबाकड आला तेव्हा बजाबानं पावती द्यायला नकार दिला. आता हे प्रकरण बैतोबाच्या देवळापर्यंत पोचलं. 
              बजाबा येताच म्हातारीचा आणखी कालवा सुरू झाला. तान्याच्या बायकोला तिच सावज सापडलं तशी तीही म्हातारीच्या पुढे होत शीव्या देऊ लागली. बजाबा त्या दोघींच्यापुढं कमी पडू लागला. शेवटी पाटलानं मध्यस्थी करत गोंधळ थांबवला. 
पाटील म्हणला,"खुळ्यावानी भांडू नगा, एकएकानं बोला. तान्या बायकूला आवर घाल. देवाम्होरं शीव्या नगं"
बजाबा सांगू लागला,"व्हय पाटील, जिमिन इकायच्या वक्ताला ह्यनं मिंदू इकला हुता व्हयं"
"व्हयं पर झाली एक डाव चुकी, बजा आर नग लय ताणून धरू" आप्पा म्हणाले.
तशी म्हातारी खेंदारली,"पह्यल्यापस्न ह्यो मेला डोळा ठिवन् हुता जिमिनीव. यकल पोर बघून भुलावतो व्हय रं त्यला. मी हाय खमकी बापडी त्यजाबरं. माजा सोन्याचा घास गिळाया टपलायस व्हयं रं. आर बापजाद्याची पुण्याई हाय ती तशी न्हाय पचायची तुला." 
"ए म्हातारे, मला काय करायची हाय तुझी जिमिन, माझीच मला मस हाय. तान्याला इकून खाणारी तू. आमास्नी नग शिकवू." बजा म्हातारीवर खेकासला.
"बजा आर तुज्या पाया पडतो, माझा जीव नग घीव आता. मी माझ्या मरणानं मरतुया, तू नग आनी धपाट्या घालू." शांत बसलेला तान्या आता बजाच्या हातापाया पडत कळवळू लागला. तेवढ्यात देशमुख म्हणाला,
"आर् मग आडलय कुठं? बजा, दिऊन टाक त्यजी इसाराची पावती त्यला, तान्या तुबी दे त्यजं पैक." 
"आन् याज कशान् दिव व्? घर इकू व्हय माज?" बजा म्हणला.
"म्हंजी र?" पाटलानं डोळे बारीक करत विचारल.
"मी काय पैका पुरुन ठिवला हुता व्हय, ह्यजी जिमिन घ्ययापाय? दहा घरं फिरुन रुपय गोळा केलं. हजारामागं दोनशे आगुदरच काढून घेतलं सावकारानं. आन आता ह्यो जिमिन द्यायाची नाय म्हंतो म्हंजे मी पाक गळ्याइतका बुडलो." बजानं पाटलाला फोडून सांगितलं.
"लेका पाक रिन काढून सण केलास की रं तू" देशमुखानं हिणवलं. आता तान्या रडकुंडीला येत विनवू लागला,
"आप्पा ह्यो गुतडा आता तुमीच सोडवा." 
"काय करतो तान्या आता झाल्या गलत्या निस्तारायच्या. सांगतो तस करा. तान्या तू आपला इसार धरून चार हजार रुपय बजाला दी आनं पावती घी त्यजाकडनं. काय बजा पटतयं नव्ह तुला." बोलता बोलता आप्पांचे डोळे चमकले. बजाच्या आकसलेल्या चेहऱ्यावरच्या रेषा क्षणात विखुरल्या. त्यावेळी मला त्या दोन मुखवट्यांचा अर्थच समजला नाही. 
        जत्रेत विकायला येणारे विदुषकाचे, देवाचे, राक्षसाचे बहुरंगी मुखवटे किती एकतारी असतात. विदुषकाचा किंवा देवाचा मुखवटा असला तर तो हसरा असतो. पण दोघांच्या हसण्यात दोन ध्रुवांच अंतर असतं. यापैकी देवाचं हसणं निर्विकार आणि विदुषकाचं खेळकर. राक्षसाच्या मुखवट्यात भीतीच्याच कित्येक छटा भरल्या जातात. पण खऱ्याखुऱ्या भीतीचे मुखवटे हे राक्षसी नसून मानवीच जास्त आहेत. कारण ते एकरंगी असले तरी एकतारी नाहीत. बऱ्याच जणांचे मुखवटे त्यांच्या चेहऱ्यावरल्या रेषांत वेळोवेळी प्रकट होतात. त्या रेषा दिसतात मात्र ज्याला त्या वाचता येतात तो भाग्यवान. उरलेल्यांचे मुखवटे उराशी जिवंत विस्तव बाळगलेल्या राखेप्रमाणे स्थिर असतात. 
           असेच असतील ते दोन मुखवटे. त्यावेळी मला ते वाचता आले असते तर. माझी कुवतही नव्हती तेवढी. पाचवीतल्या मुलाला काय कळणार आपल्या बापाच्या पाचवीला काय पुजून ठेवलं होतं ते. शेवटी तान्या खूप हातापाया पडला, पण बजा बधला नाही. आप्पांना विनवू लागला पण 'बैतोबाचा कौल' अस ठोकून आप्पांनी अंग काढून घेतलं. पाठोपाठ देशमुख, पाटील दोघांनी आप्पांना सहमती दिली. बिचारा तान्या रागारागानं घरी गेला. त्यानं स्वत:च्या दहा थोबाडीत हाणून घेतल्या. दुसऱ्याच दिवशी दाव्याला बांधलेल्या दुभत्या म्हशीला त्यानं बाजार दाखवला. ती तेवढीच एक वस्तू तान्याच्या मालकीची उरली होती. इसाराचे दहा आणि व्याजाचे चार हजार रुपये बजाच्या मढ्यावर घालून तो घरी आला आणि इसाराची पावती म्हातारीच्या अंगावर फेकत घर सोडून निघून गेला तसा तो परत आलाच नाही. 
                  इकडं तान्याची बायको तान्याचा दोसरा काढत अंथरुणावर खिळली ती उठलीच नाही. तान्या असताना त्याची चव न ठेवणाऱ्या या बाईनं तान्यासाठी अंथरुण धरलं हे काही केल्या पटण्यासारखं नव्हतं. पण गावात एकदा बोंब सुटली की ती हवा गिळून फुगणाऱ्या बेडकासारखी पसरते. तीचा बैल होत नाही. तिला कसलातरी भयंकर रोग झाला होता. त्यानं ती खंगत मरत होती. आपल्यामुळं आपल्या घरादाराची झालेली काईली पाहून सजा वाणीण वेड्यासारखी वागू लागली. लोकांच्या नसलेल्या उधाऱ्या मागत त्यांच्या दारापुढं जाऊन तोंड वाजवू लागली. बजाच्या नावान बोटं मोडत गावभर हिंडू लागली. तिच्या अशा वागण्यान तिचं दुकानही बंद पडलं. 
"तान्याची हाय सासू सुनंला जगू बी द्यायची नाय आण सुखानं मरु बी." पिचकाऱ्या थुकत गावातल्या लोकांना चघळायला विषय झाला.

फोडणी

दोन सुशब्द झाल्यावर आणखी 'प्रस्तावना' कशाला? म्हणून  ही प्रस्तावना नसून 'फोडणी' आहे. फोडणी दिल्याशिवाय भाजी साधत नाही. ही फोडणी केवळ कथेची नाही त्यातल्या पात्रांचीही आहे पण वेगळ्या अर्थाने. कथा दोन पात्रांच्या आत्मवृत्तात फोडून विभागली आहे. कथेतील आत्मवृत्तांचे एकाड एक एकूण पाच भाग आहेत, 'दत्ता' आणि 'अरविंदा'. ही आत्मवृत्त या कथेपुरतीच मर्यादित आहेत. ती एकाच गांडुळाची दोन मुंडकी आहेत. कथा एकच आत्मवृत्त दोन. ती एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असली तरी एकाच वाटेनं चालत कथा एकसंध ठेवतात. यातल्या अरविंदाची बोलीभाषा गावंढळ आहे. आत्मवृत्त लिहिताना मौनिक भाषा (मनाची विचार करण्याची भाषा) महत्त्वाची. मौनिक भाषा हे बोलीभाषेचच बीज असत. आंतरिक गर्भात जेव्हा मौनिक भाषेचं बीज रुजत, तेव्हा कुठे बोलीभाषेची रोप उगवतात. यातली सगळीच बीज उगवतातच अस नाही. बरीच बीज तिथंच गुरफटून उगवणाऱ्या बीजांची खत बनतात. अरविंदाचं आत्मवृत्त त्याच्या मौनिक भाषाशैलीत लिहिणं थोड जड जाईल आणि पहीलाच प्रयत्न असल्या कारणाने माझी कथाही भरकटेल म्हणून ती समांतर ठेवून पुढे सरकत जाण्यासाठी बोलीभाषेला धक्का न लावता दोघांचीही आत्मवृत्त एकाच मौनिक भाषेत अविरत राखली आहेत.  कथेचे भाग सुशब्द मध्ये add केले आहेत.

कुरकुडीची फुलं

दोन सुशब्द
             हे लिहणारा मी नाहीच. यातला मी मला कुठेच सापडत नाही. तो नक्की कोण असावा तेही मला माहित नाही. तो येतो पावसाच्या गारांसारखा. त्याच पाणी होण्याआधी पटपट वेचून तोंडात घालाव्यात. त्याच्या गार चवीनं तृप्त होऊन जावं. कविता, कथानक सार पुरवणारा तोच. कथा बांधणं, रंगवणं, अर्थपूर्ण रचनेत ती उमटवणं, वर्णनात्मक अलंकारांची रेलचेल करुन तीची धाटणी करणं, शब्दांच्या कसरतीची तालीम भरवणं, हे सारे नंतरचे खेळ. कथा म्हणजे भर उन्हात प्रतिभेचा पाऊस. तो कधीही सांगून यायचा नाही अगदी लेखकालाही नाही. एक एक शब्द म्हणजे कथेचा इंद्रधनुष्य. त्यातला सफेद रंग म्हणजे त्या कथेचा भाव, तो दिसण्यापेक्षा त्याचं जाणवण महत्त्वाचं. तो नसेल तर इंद्रधनुष्य अपूर्णच. त्यानंतर ती कथा कागदावर उतरवणं म्हणजे कंटाळवाण काम, 'नाकापेक्षा मोती जड'. पण मोती मिरवायचा असेल तर नथ घालायलाच हवी. मला कितपत गारा वेचता आल्या ठाऊक नाही, शब्दांचा इंद्रधनुष्य साधला असेल नसेल माहित नाही, पण पाऊस मात्र नक्की येऊन गेला. त्याचा थंडावा, ओलावा आणि सफेद रंग तुम्हाला अनुभवास देण्याचा हा पहिलाच छोटासा प्रयत्न. 

खाली दिलेल्या sections वर क्लिक केल्यानंतर हवा तो भाग वाचता येईल..


वास्तुपुरुष

भरलेल्या आभाळानं पहाटेचा उसासा रोखून धरला होता. कोपऱ्यांना गुडघ्याशी मुडपून दोन्ही हाताच्या आवळलेल्या मुठी हनुवटीशी एकत्र ठेवत ए...